
सोलापूर, 10 डिसेंबर, (हिं.स.)। शहरातील वाहतूक व्यवस्थेचा भार कमी करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सोलापूर महापालिकेने आज महत्त्वपूर्ण पावले उचलली. महापालिका आयुक्तांनी शहरातील विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट व तातडीचे निर्देश दिले.साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक ते दमाणी नगरदरम्यानचा १०३ वर्षे जुना पूल पाडण्यात येणार असून, त्यापूर्वी नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यासाठी अवंतीनगर परिसरात ५४ मीटर रुंदीचा नवीन रस्ता तयार केला जात आहे. आयुक्तांनी आज या रस्त्याच्या कामाची पाहणी करत कामाचा वेग, मुरूम टप्पा व डांबरीकरणाची स्थिती तपासली. पूल पाडण्यापूर्वीच हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश कंत्राटदारास देण्यात आले.
गुणवत्ता आणि सुरक्षा निकषांचे काटेकोर पालन करावे, असेही आयुक्तांनी सांगितले.यानंतर डोंणगाव रोड या पर्यायी मार्गाची पाहणी करण्यात आली. काही ठिकाणी सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच रस्ता सुरक्षित करण्यासाठी आवश्यक दुरुस्ती, लाईट पोल शिफ्टिंग आणि अतिक्रमण हटवण्याबाबत संबंधित विभागांना तत्काळ उपाययोजना करण्यास सांगण्यात आले.आयुक्तांनी विष्णू चाळ येथील सार्वजनिक शौचालयाची पाहणी करत स्वच्छता, सुविधा व पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्याचे आदेश दिले. तर दहीटणा गावातील नव्याने पूर्ण झालेले शौचालय समाधानकारक असल्याचे निरीक्षण करण्यात आले.
या पाहणी दौऱ्यात नगर अभियंता सारिका आकूलवार, नियंत्रण अधिकारी तपन डंके, अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी, प्रकाश सावंत, विभागीय अधिकारी सरकाझी, सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सहायक अभियंता प्रकाश दिवाणजी, सागर करोसेकर आदी अधिकारी उपस्थित होते.सोलापूर महानगरपालिका पायाभूत सुविधा, रस्ते, स्वच्छता व नागरी सुविधा सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी नियमित पाहणी आणि प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड