
राज्यभरातून ४,०३९ टूर पॅकेज मधून १९.२४ कोटींची कमाई
मुंबई, 10 डिसेंबर (हिं.स.)।महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ‘पॅकेज टूर’ उपक्रमाने अवघ्या सहा महिन्यांत यशाचा नवा इतिहास रचला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष मा. प्रताप सरनाईक यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून सुरू झालेल्या या योजनेला जनतेचा अफाट प्रतिसाद मिळत असून, एप्रिल २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राज्यभरात तब्बल ४,०३९ पॅकेज टूर यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहेत.
या कालावधीत एसटीच्या बसेसने सुमारे २६.९७ लाख किलोमीटरचा प्रवास करत ₹१९.२४ कोटींचे उत्पन्न मिळवले आहे.
सांगली विभागाने ५८१ टूरसह अव्वल स्थान पटकावले, तर कोल्हापूर (५६१), सातारा (३९१), अहिल्यानगर (३६२) आणि पुणे (२८८) हे विभागही आघाडीवर राहिले.
महसूलाच्या बाबतीत कोल्हापूर विभागाने ₹३.२५ कोटींच्या उत्पन्नासह बाजी मारली, तर अहिल्यानगर (₹२.४५ कोटी), सांगली (₹२.३५ कोटी), सातारा (₹२.११ कोटी) आणि पुणे (₹१.३६ कोटी) या विभागांनीही भरघोस महसूल मिळवला.
मराठवाड्यातील नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व जालना, तसेच विदर्भातील नागपूर, भंडारा, गडचिरोली, वर्धा, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, अकोला व यवतमाळ या विभागांमध्येही पॅकेज टूरला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
पर्यटनाला नवे पंख, एसटीच्या तिजोरीला बळ!
या पॅकेज टूर सेवेमुळे एकीकडे राज्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळाली असून, दुसरीकडे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. आगामी काळात अधिक नावीन्यपूर्ण आणि आकर्षक पॅकेज टूर सुरू करण्याचे संकेतही महामंडळाकडून देण्यात आले आहेत. तरी प्रवाशंना आवाहन करण्यात येते की, या सेवेचा लाभ घ्यावा.
एसटीची लालपरी आता प्रवासासोबतच पर्यटनाचा आनंदही घडवत असून, राज्यभर ‘पॅकेज टूर’चा सुवर्णकाळ सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे!
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर