
सोलापूर, 10 डिसेंबर, (हिं.स.)। जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नऊ लाख लाभार्थी राहिले आहेत. त्या सर्व महिलांना ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करून घ्यावी लागणार आहे. मुदतीत ई-केवायसी न करणाऱ्या लाडक्या बहिणींचा लाभ कायमचा बंद होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील तीन लाख ७७ हजार महिलांनी अजूनही ई-केवायसी केलेली नाही.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख नऊ हजार महिलांनी अर्ज केले होते. त्यांना सुरवातीचे तीन-चार महिने लाभ मिळाला. पण, योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार पडताळणी झाली. त्यानुसार संजय गांधी निराधार योजना, चारचाकी वाहने, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला, २१ पेक्षा कमी व ६५ पेक्षा जास्त वय असलेल्या महिलांसह शासकीय कर्मचारी महिलांचा लाभ बंद करण्यात आला.या निकषांत जिल्ह्यातील दोन लाख महिला अपात्र ठरल्या. आता शेवटच्या निकषांनुसार ई-केवायसी करून घेतली जात आहे. त्यातून लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे की कमी, हे स्पष्ट होणार आहे. त्यात एकट्या सोलापूर जिल्ह्यातील अंदाजे तीन लाखांवर महिला अपात्र ठरतील, असा अंदाज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड