
नवी दिल्ली , 10 डिसेंबर (हिं.स.)।राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या व्हिसा धोरणावर सतत कठोर पावले उचलत आहेत. ट्रम्प प्रशासनाने जानेवारी 2025 पासून आतापर्यंत जगभरातील 85,000 व्हिसा रद्द केले आहेत, तर दुसऱ्या बाजूला आता एच-1बी व्हिसासाठी अनेक भारतीयांची अमेरिकन दूतावासातील मुलाखती पुढील वर्षासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यानुसार भारतातील अमेरिकन दूतावासाने मंगळवार, 9 डिसेंबर च्या रात्री व्हिसा अर्जदारांसाठी एक सल्ला जारी केला आहे.
मंगळवार रात्री अमेरिकन दूतावासाने व्हिसा अर्जदारांना सल्ला दिला की ज्यांना मुलाखती रद्द झाल्याचा ईमेल आला आहे, त्यांना नवीन तारखेला मदत उपलब्ध करून दिली जाईल. एवढेच नव्हे, दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट करून इशारा दिला की पूर्व-निश्चित मुलाखतीवर येणाऱ्या अर्जदारांना प्रवेश दिला जाणार नाही. काही अहवालांनुसार, डिसेंबरच्या मध्यापासून अखेरपर्यंत होणाऱ्या मुलाखती मार्च 2025 पर्यंत पुढे ढकलल्या आहेत, किती मुलाखती रद्द किंवा स्थगित केल्या आहेत याबाबत अद्याप स्पष्ट माहिती दिलेली नाही.
अमेरिकेने नवा नियम लागू केला आहे की आता प्रत्येक एच-1बी आणि एच-4 व्हिसा घेणाऱ्या व्यक्तीचे फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन, स्नॅपचॅट यांसह सर्व सोशल मीडिया अकाउंट्स पूर्णपणे तपासले जातील. ही तपासणी 15 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. या प्रक्रियेसाठी अमेरिकन दूतावासाला खूप वेळ लागणार असल्याने ते डिसेंबरमधील सर्व मुलाखती घेऊ शकत नाहीत. त्यामुळे सर्व मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ज्यांची व्हिसा मुलाखत होणार आहे, त्यांनी आपल्या सर्व सोशल मीडिया अकाउंट्सची प्रायव्हसी सेटिंग ‘पब्लिक’ करावी लागणार आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांना सर्वकाही पाहता आले, तरच मुलाखत घेतली जाईल.
ट्रम्प प्रशासनाचे हे पाऊल एच-1बी कार्यक्रमावर वाढणाऱ्या देखरेखीचा भाग आहे, जो अमेरिकेत कुशल परदेशी कामगारांसाठी प्रमुख इमिग्रेशन मार्ग मानला जातो. यापूर्वी सप्टेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नवीन एच-1बी व्हिसावर $100,000 (सुमारे 88 लाख रुपये) इतके एकरकमी शुल्क लावले होते. याशिवाय, अमेरिकेने काही देशांतील लोकांसाठी ग्रीन कार्ड, नागरिकत्व आणि इतर इमिग्रेशन अर्जांनाही थांबवले आहे, विशेषतः तेव्हा जेव्हा अफगाण मूळच्या एका व्यक्तीने नॅशनल गार्ड सैनिकांवर हल्ला केला होता.
दुसरीकडे, ट्रम्प प्रशासनाने जानेवारीपासून आतापर्यंत 85,000 पेक्षा जास्त व्हिसा रद्द केले आहेत. ही माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर लिहिले की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो कठोर इमिग्रेशन नियम लागू करण्यासाठी सतत काम करत आहेत. त्यांचा एकच उद्देश आहे — अमेरिकेला अधिक सुरक्षित बनवणे. रद्द करण्यात आलेल्या व्हिसांपैकी 8,000 पेक्षा जास्त व्हिसे विद्यार्थ्यांचे होते. त्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे, चोरी आणि हल्ला यांसारखे गुन्हे प्रमुख कारण होते. अशा गुन्ह्यांमुळे गेल्या वर्षभरात जवळपास निम्मे व्हिसे रद्द करण्याची वेळ आली. मात्र, उर्वरित व्हिसे का रद्द करण्यात आले, याबाबत अद्याप सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode