
पुणे, 10 डिसेंबर (हिं.स.)।
महापालिकेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यापूर्वीच निवडणुकीच्या गोपनीयतेचा भंग करत भाजप पदाधिकारी व महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी संगनमत करून मतदारयाद्यांमध्ये बदल व फेरफार केले आहेत. या गंभीर प्रकाराचे सीसीटीव्ही चित्रीकरणही उपलब्ध आहे, असा प्रकार शहरात अन्य ठिकाणीही झाल्याचे नाकारता येत नाही.' असा गौप्यस्फोट करत कॉंग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून भाजप पदाधिकारी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी' अशी मागणी महापालिका आयुक्त व राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
संजय बालगुडे यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील सीसीटीव्ही चित्रीकरण सादर करत माहिती दिली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख गजानन थरकुडे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, ऍड.असीम सरोदे उपस्थित होते.
बालगुडे म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्या. मात्र त्यापूर्वीच भाजप पदाधिकारी व महापालिकेच्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी एकत्र बसून वेगवेगळ्या मतदार याद्या फोडत होते. या प्रभागामधील मतदार दुसऱ्या प्रभागामध्ये टाकत मतदार यादीत फेरफार केला जात होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु