अपघात रोखण्यासाठी पिंपरी चिंचवडचा नवा प्रयोग
पुणे, 10 डिसेंबर (हिं.स.)। पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात गेल्या काही काळात मद्यधुंद चालकांमुळे बस अपघात वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) प्रत्येक बसमध्ये ''ब्रेथ ॲनालायझर इग्निशन सिस्टीम'' बसविण्याचा प्
PCMC


पुणे, 10 डिसेंबर (हिं.स.)।

पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात गेल्या काही काळात मद्यधुंद चालकांमुळे बस अपघात वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) प्रत्येक बसमध्ये 'ब्रेथ ॲनालायझर इग्निशन सिस्टीम' बसविण्याचा प्रस्ताव आणला आहे.एखादा बसचालक दारू पिऊन बस चालवणार असेल, तर संबंधित बसचे इंजिनच सुरू होणार नाही, अशी ही यंत्रणा आहे. शहरातील काही बसमालकांनी आपल्या बसमध्ये ही यंत्रणा बसवली असून, सर्व बसमध्ये ती बसवण्यासाठी 'आरटीओ' जनजागृती करीत आहे.मद्यपान केलेल्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस पदपथावर चढल्याची घटना नुकतीच हिंजवडी येथे घडली. या अपघातात तीन भावा-बहिणींचा मृत्यू झाला. मद्यपान करून वाहन चालविण्याचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला. या गोष्टीची गंभीर दखल घेऊन पिंपरी-चिंचवड 'आरटीओ'ने शहरातील सर्व बसमालक आणि वाहतूक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात बसमध्ये यंत्रणा बसविण्याच्या विषयावर सकारात्मक चर्चा झाली. काही जबाबदार बसमालकांनीही स्वखर्चाने ही यंत्रणा बसवली. 'ब्रेथ ॲनालायझर इग्निशन सिस्टीम' ही आधुनिक सुरक्षाव्यवस्था चालकाने वाहन सुरू करण्याआधी श्वासातील अल्कोहोलची पातळी तपासते. प्रवासी वाहतुकीतील सुरक्षेच्या दृष्टीने 'आरटीओ'ने ही प्रक्रिया राबवण्यासाठी वेगाने हालचाल सुरू केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande