
पुणे, 10 डिसेंबर (हिं.स.)। पुणे शहरातील शंभर किलोपेक्षा जास्त ओला कचरा निर्माण करणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, व्यापारी संकुले, संस्था, आस्थापना आणि सोसायट्यांनी स्वतःच्या परिसरात ओला कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, महापालिकेच्या सर्वेक्षणात तब्बल ६०० पेक्षा जास्त संस्था व सोसायट्यांमध्ये हे प्रकल्प बंद असून, ते तातडीने सुरू करण्याची नोटीस या सोसायट्यांना दिली जाणार आहे.ज्या सोसायट्यांचे प्रकल्प बंद असतील, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दिले आहेत.
महापालिकेच्या क्षेत्रात १०० किलोपेक्षा जास्त ओला कचरा निर्माण करणाऱ्या सर्व संस्था व सोसायट्यांसाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प अनिवार्य करण्यात आले आहेत. शहरात अशा सुमारे दोन हजारपेक्षा अधिक ठिकाणी हे प्रक्रिया प्रकल्प असल्याची नोंद आहे. त्यानुसार महापालिकेकडून तपासणी करण्यात आल्यानंतर या तपासणीत सहाशेपेक्षा अधिक प्रकल्प बंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांना तातडीने नोटीस बजावण्यात येणार आहे.याबाबत माहिती देताना अतिरिक्त आयुक्त म्हणाल्या, की शहरातील आस्थापना शंभर किलोपेक्षा जास्त ओला कचरा तयार करतात. त्यांना २००० च्या बांधकाम नियमावलीनुसार स्वतःच कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. शहरात अशा १९४२ आस्थापना असून, त्यांच्याकडून दररोज २० टनपेक्षा अधिक कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणे अपेक्षित आहे. मात्र, पाहणीत प्रत्यक्ष स्थिती वेगळी असल्याचे दिसून आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु