
नागपूर, 10 डिसेंबर, (हिं.स.)। राज्यातील औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या संदर्भात सुरक्षा उपाययोजना न पाळणाऱ्या उद्योगांवर खटले दाखल केले जातील. कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने न देणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई केली जाईल तसेच विनापरवाना युनिट्सकरिता ‘स्पेशल ड्राईव्ह’ घेण्यात येईल, अशी माहिती कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी लक्षवेधी उत्तरात दिली.
विधानसभा सदस्य शंकर जगताप, अर्जुन खोतकर, बाबाजी काळे यांनी पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे एका कंपनीमध्ये स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेसंदर्भात प्रश्न विचारला होता.
कामगार मंत्री ॲड.फुंडकर म्हणाले की, एमआयडीसीतील सर्व कारखान्याचे सुरक्षा ऑडिट केले जाणार असून काही त्रुटी आढळल्यास त्यांना सूचना देण्यात येतील. सूचना देऊनही त्याचे पालन न झाल्यास त्यांच्यावर खटले दाखल केले जातील आणि दंडात्मक कारवाई केली जाईल.
अंबिका मेटल फिनिशर, एमआयडीसी भोसरी, पुणे येथे लागलेल्या आगीच्या घटनेत मृत झालेल्या कामगाराच्या कुटुंबाला रु. 3.50 लाखांचे सानुग्रह अनुदान कंपनीकडून देण्यात आले आहे. अधिकची नुकसानभरपाई श्रमिक नुकसानभरपाई आयोग, पुणे यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याचे मंत्री ॲड.फुंडकर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर