
सोलापूर, 10 डिसेंबर (हिं.स.)।
ऊसाला दर जाहीर करा म्हणून गळीत हंगामाच्या कार्यक्रमातच शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे घडली आहे. तरीही साखर कारखाना प्रमुखांनी आश्वासन न दिल्याने शेतकऱ्यांनी कार्यक्रमानंतरचा भोजनाचा आस्वाद न घेता परतणे पसंद केल्याचे दिसून आले आहे.दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे नव्याने सुरू होणाऱ्या लोकशक्ती साखर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम नुकताच पार पडला. या तालुक्यात चार कारखाने असतानाही नव्याने सुरू होणाऱ्या या कारखान्यात चांगला भाव मिळेल म्हणून मोठ्या संख्येने सीना–भीमा खोऱ्यातील शेतकरी कार्यक्रमाला उपस्थित होते. गव्हाणीतील मोळी पूजनानंतर शेतकरी मेळावा झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कारखाना उभारणीसाठी झालेल्या घडामोडीची माहिती दिली. कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी कारखाना कसा चालू होणार याची सविस्तर माहिती दिली. त्यांनी आपले भाषण संपवताच उपस्थित शेतकऱ्यांनी कारखान्याचा भाव जाहीर करा, अशी घोषणाबाजी सुरू केली. पण खोराटे यांनी या मागणीकडे लक्ष न देता चांगला दर देऊ असे म्हणत आपले भाषण संपवले. त्यामुळे शेतकऱ्यांची घोषणाबाजी आणखीनच वाढली. शेवटी कारखान्याचे मुख्य प्रवर्तक विजयराज डोंगरे यांनी हस्तक्षेप करीत कारखान्याचा पहिलाच गळीत हंगाम आहे. उसाच्या रिकव्हरीवरून ऊसदर ठरविला जातो. त्यावरून आपण चालला दर देऊ असे त्यांनी सांगितले. पण तरीही शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. या कार्यक्रमानंतर शेतकऱ्यांना स्नेहभोजनाची व्यवस्था केली होती. पण नाराज झालेल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी स्नेहभोजनाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड