वैदिक धर्म, राष्ट्रधर्म आणि ‘शंखनाद महोत्सवा’चे महत्त्व !
सनातन वैदिक धर्म हा भारताचा आत्मा आहे, आणि राष्ट्राच्या अस्तित्वाचा खरा आश्रयही तोच. “यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धीः स धर्मः” ही भारतीय तत्त्वज्ञानाची दिव्य व्याख्या आहे. जी जीवनाच्या दोन्ही पातळ्यांना संतुलित करते: लौकिक उन्नती आणि परमकल्याण. जगात अ
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव


दुर्गेश परुळकर


सनातन वैदिक धर्म हा भारताचा आत्मा आहे, आणि राष्ट्राच्या अस्तित्वाचा खरा आश्रयही तोच. “यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धीः स धर्मः” ही भारतीय तत्त्वज्ञानाची दिव्य व्याख्या आहे. जी जीवनाच्या दोन्ही पातळ्यांना संतुलित करते: लौकिक उन्नती आणि परमकल्याण. जगात अनेक विचारसरणी उदयास आल्या, काही प्रभावी ठरल्या, काही लयास गेल्या; परंतु मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट काय आहे, हे सांगण्याची स्पष्टता केवळ सनातन धर्माकडेच आहे. म्हणूनच भारत हे केवळ भूभागाचे नाव नसून एक सर्वश्रेष्ठ संस्कृती, एक जीवन जगण्याची तेजस्वी परंपरा, अविनाशी धर्मजीवन आहे. म्हणूनच भारत एक शाश्वत आध्यात्मिक राष्ट्र आहे.

जगातील ग्रीक, रोमन, झारची रशिया ही प्रबळ साम्राज्ये वेळोवेळी उभी राहिली आणि नष्ट झाली. परंतु भारत आजही तितक्याच सामर्थ्याने उभा आहे, कारण या राष्ट्राचे अस्तित्व राजकीय बांधणीत नसून, लोकांच्या मनातील संस्कृती, श्रद्धा, धर्मनिष्ठ मूल्ये, आणि पवित्र परंपरांमध्ये आहे. राम, कृष्ण, शिव, गाय, गंगा, मातृभूमी या सर्वांविषयीची अनुभूती आजही भारतीयांच्या चेतनेत आहे अन् हृदयामध्ये धडधडते. म्हणूनच भारत अविनाशी आहे. राष्ट्राला नष्ट करायचे अनेक प्रयत्न झाले; मात्र अवतार, संत राष्ट्रपुरुष यांनी वेळोवेळी भारताचे रक्षण केले हा इतिहास दाखवतो; आणि म्हणूनच भारताच्या धर्मजीवन, भावजीवनाचे रक्षण म्हणजे धर्मरक्षण !

आज भारत तांत्रिक, सामरिक आणि अर्थकारणात झपाट्याने पुढे जात असला, तरी दहशतवाद, नक्षलवाद, सांस्कृतिक विघातकता, अतिरेकी विचारसरणी आणि आंतरिक फूट यांसारखी अनेक आव्हाने समोर आहेत. केवळ राजकीय धोरणांनी किंवा मतांसाठी झुकणाऱ्या धर्मनिरपेक्षतेने राष्ट्र सुरक्षित राहणार नाही. राष्ट्राला जीवंत ठेवणारी शक्ती म्हणजे धर्माधिष्ठित जीवनमूल्ये, साधकता, शौर्य आणि सामाजिक बांधिलकी. म्हणूनच भारतीय राष्ट्रपुनरुत्थानाचा मार्ग सनातन धर्मातूनच जातो, हे योगी श्रीअरविंदांनी स्पष्ट केले होते.

या पार्श्वभूमीवर दिल्लीतील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून राष्ट्रचेतनेचे पुनरुज्जीवन करणारा ऐतिहासिक सोहळा आहे. १३ आणि १४ डिसेंबर २०२५ रोजी भारत मंडपममध्ये होणाऱ्या या महोत्सवात संरक्षण, संस्कृती, समाजजीवन, राष्ट्रीय सुरक्षा, परंपरा आणि तत्त्वज्ञान यांच्यातील संबंधांवर अभ्यासपूर्ण चर्चा होणार आहे. २५० हून अधिक विविध प्रकारची शिवकालीन शस्त्रप्रदर्शनी, पारंपरिक युद्धकलेचे प्रात्यक्षिक, विशेष तज्ज्ञांचे मार्गदर्शन, संत-महंतांची प्रेरणा आणि ‘विश्वकल्याणकारी सनातन राष्ट्र’ या विषयावरचे सखोल सत्र, हे सर्व राष्ट्राला नवीन दिशा देणारे ठरणार आहे.

महाभारतात श्रीकृष्णांनी जसा धर्मयुद्धासाठी शंखनाद केला, तसा आजचा हा महोत्सवही भारताला धर्माधिष्ठित, सुरक्षित आणि जागृत राष्ट्राकडे नेणारा नवा शंखनाद आहे. प्रत्येक सनातन धर्मीयांनी हा संदेश आत्मसात करून कृतीत उतरवला, तर हा महोत्सव नवयुगाची, रामराज्याची सुरुवात ठरेल.

- दुर्गेश परुळकर, ज्येष्ठ लेखक तथा व्याख्याते

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande