सशस्त्र सेना ध्वज दिन : राष्ट्रनिष्ठा, कृतज्ञता आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे प्रतीक
७ डिसेंबर हा दिवस भारतात ‘सशस्त्र सेना ध्वज दिन’ (Armed Forces Flag Day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ औपचारिकतेचा वा परंपरेचा भाग नाही, तर राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या सैनिकांविषयी कृतज्ञता, सन्मान आणि सामाजिक कर्तव्य
सशस्त्र सेना ध्वज दिन


७ डिसेंबर हा दिवस भारतात ‘सशस्त्र सेना ध्वज दिन’ (Armed Forces Flag Day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ औपचारिकतेचा वा परंपरेचा भाग नाही, तर राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या सैनिकांविषयी कृतज्ञता, सन्मान आणि सामाजिक कर्तव्य व्यक्त करण्याचा दिवस आहे. भारत हा विविधतेने नटलेला, भौगोलिक व सांस्कृतिक वैविध्य असलेला राष्ट्रराज्य आहे. अशा देशात राष्ट्रीय एकात्मता आणि सुरक्षेची पायाभरणी सशस्त्र दलांनी केली आहे. या दिवसाचे महत्व केवळ स्टिकर लावण्यापुरते मर्यादित नसून शहीदांच्या कुटुंबियांसाठी, युद्धात जखमी झालेल्या जवानांसाठी आणि सेवेतून निवृत्त झालेल्या सैनिकांसाठी समाजाने जागरूकतेने पुढाकार घेण्याच्या भावनेशी जोडलेले आहे.

समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिले तर राष्ट्र आणि सैनिक यांचे नाते हे केवळ संरक्षणाच्या करारावर आधारित नसून सामूहिक भावना, सामाजिक ऐक्य, सामूहिक सुरक्षाबोध आणि परस्पर सन्मान या मूल्यांवर आधारित आहे. सैनिक समाजाला सुरक्षा आणि स्थैर्य प्रदान करतो आणि त्या बदल्यात समाजाने सैनिकाच्या जीवनाला प्रतिष्ठा, समर्थन आणि सामाजिक स्थान देणे ही नैतिक जबाबदारी आहे. समाज, शासन व्यवस्था आणि सैनिक यांच्यातील हे परस्परावलंबी नाते लोकशाही राज्यव्यवस्थेचे मूलतत्त्व ठरते.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर अनेक युद्धे, संघर्ष आणि आंतरिक तसेच बाह्य सुरक्षा धोके भारतीय सैन्याने तोंड देत पार पाडले आहेत. १९४७-४८ मधील पहिले भारत-पाक युद्ध असो, १९६२ चे चीन युद्ध, १९६५ आणि १९७१ चे संघर्ष, १९९९ मधील कारगिल युद्ध किंवा काश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवाया असो प्रत्येक ठिकाणी भारतीय सैनिकाने अपार शौर्य, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठा प्रदर्शित केली आहे. हे युद्ध केवळ सीमांवरील संघर्ष नव्हते, तर भारतीय मानसिकतेतील स्वाभिमान, स्वतःची ओळख आणि राष्ट्रभक्तीची जडणघडण करणारे ऐतिहासिक क्षण होते. यामुळेच सशस्त्र सेना ध्वज दिन (Armed Forces Flag Day) हा फक्त कर्तव्य नसून भावनिक स्मृती जागविणारा राष्ट्रीय दिवस ठरतो.

एका सैनिकाचे जीवन हे सामान्य नागरिकांच्या जीवनापेक्षा खूप वेगळे असते. अनुशासन, कर्तव्यभावना, त्याग, मृत्यूचे सततचे सावट आणि राष्ट्राचे संरक्षण ही त्यांची दिनचर्या असते. हिमालयातील शून्याच्या खालील तापमानात, राजस्थानच्या वाळवंटातील उष्णतेत, पूर्वोत्तर भारतातील दुर्गम जंगलांमध्ये किंवा समुद्राच्या अथांग लाटांवर तैनात राहणारा सैनिक हा राष्ट्राच्या भौगोलिक सीमांचे आणि सार्वभौमत्वाचे प्रत्यक्ष रक्षण करतो. सामाजिक दृष्टिकोनातून तो राष्ट्रीय स्थैर्याचा ‘मूक प्रहरी’ असतो. आपण समाज म्हणून सुरक्षित आहोत, बाजारपेठा चालू आहेत, शाळा-कॉलेजांमध्ये अभ्यास सुरू आहे, लोकशाही प्रक्रिया निर्भयपणे चालू आहे हे सगळे सैनिकांच्या योगदानामुळे आहे. ही गोष्ट विसरू नये इतकी महत्त्वाची आहे.

या दिवसाच्या निमित्ताने सैनिकांच्या कुटुंबीयांचा उल्लेख करणे अत्यंत आवश्यक आहे. सैनिक जेव्हा युद्धात जातो तेव्हा त्याच्याबरोबर त्याचे पालक, पत्नी, मुले आणि कुटुंबिय मानसिक लढाई लढत असतात. त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा आशा आणि अनिश्चिततेचा संग्राम असतो. युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबांनी अनुभवलेली पोकळी ही केवळ वैयक्तिक नाही तर राष्ट्रीय आहे. समाजशास्त्रीय भाषेत सांगायचे तर ‘त्यागाचे सामाजिक मूल्य’ टिकवून ठेवण्यासाठी समाजाने या कुटुंबांना सन्मानाने जगण्यास मदत करणे हा सामाजिक न्यायाचा एक विस्तार आहे.सशस्त्र सेना ध्वज दिन (Armed Forces Flag Day) हा दिवस या मूल्यांना प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचा दिवस आहे.

सेवेतून निवृत्त झालेले सैनिक राष्ट्राच्या सामर्थ्याचे महत्त्वाचे घटक असतात. त्यांच्याकडे अनुभव, शिस्त, नेतृत्व आणि प्रबळ राष्ट्रीय मूल्यांची शिदोरी असते. परंतु अनेक सैनिकांना सेवेनंतर नागरी जीवनाशी जुळवून घेणे कठीण जाते. युद्धातील आठवणी, शारीरिक जखमा आणि सामाजिक पुनर्वसन या समस्या अनेक निवृत्त सैनिकांना भेडसावतात. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनासाठी रोजगार, आरोग्यविमा, मानसोपचार समर्थन आणि सामाजिक स्वीकार या गोष्टींची आवश्यकता निर्माण होते.सशस्त्र सेना ध्वज दिन (Armed Forces Flag Day) हा दिवस समाजाला यासाठी सक्रिय भूमिका बजावण्यास प्रेरित करतो.

आजचा युद्धाचा संदर्भ बदलत चालला आहे. आधुनिक युद्ध हे केवळ बंदुकींचे नसून तंत्रज्ञानाचे, माहितीचे, सायबर सुरक्षा, अंतराळ संरक्षण आणि गुप्तचर कौशल्ये यांच्या आधारे लढले जाते. त्यामुळे सैन्यदल केवळ युद्धाचे साधन नसून राष्ट्रीय तंत्रज्ञान, संशोधन, संरक्षण उद्योग आणि आत्मनिर्भरतेच्या विकासाचा वाहक ठरत आहे. हेही समाजशास्त्रीयदृष्ट्या पाहिले असता राष्ट्राच्या समग्र विकासाचे पाऊल आहे.

या दिवसाचे खरे महत्त्व तेव्हाच सिद्ध होते जेव्हा प्रत्येक नागरिक आपल्या जबाबदारीची जाण ठेवून या दिवसाचे महत्त्व मनापासून स्वीकारतो. आजचा दिवस हा केवळ एका दिवसापुरता विचार करण्याचा नाही, तर राष्ट्र म्हणून सैनिकांविषयी आदराची संस्कृती निर्माण करण्याचा दिवस आहे. शाळांमध्ये, माध्यमांमध्ये, समाजात आणि धोरणामध्ये सैनिकांविषयीची संवेदनशीलता जिवंत ठेवणे अत्यावश्यक आहे.

शेवटी सांगावेसे वाटते की सशस्त्र सेना ध्वज दिन (Armed Forces Flag Day) हा दिवस केवळ स्मरणाचा नाही तर संकल्पाचा दिवस आहे. सैनिकांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा, समाज म्हणून आपली जबाबदारी ओळखण्याचा आणि राष्ट्रासाठी रक्षणकर्त्यांशी अखंड निष्ठेचा. जोपर्यंत राष्ट्र सैनिकांचे ऋण मानते आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करते तोपर्यंत राष्ट्र सुरक्षित, समर्थ आणि सशक्त राहते. त्यामुळे सशस्त्र सेना ध्वज दिन (Armed Forces Flag Day) हा दिवस राष्ट्रीय चेतनेचे, सामाजिक बांधिलकीचे आणि अभिमानाचे प्रतीक म्हणून सदैव साजरा होत राहावा हीच खरी भारतभक्ती, हीच खरी मानवता आणि हीच खरी राष्ट्रसेवा होय.

डॉ. राजेंद्र बगाटे (लेखक, समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत) मो. ९९६०१०३५८२

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande