
नागपूर, 10 डिसेंबर, (हिं.स.) : पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वारगेट, शनिवारवाडा येथे तीन मार्गिकेचे दोन भुयारी मार्ग तयार करण्याचे काम पुणे महानगरपालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग यापैकी कोणी करावे, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निर्णायक बैठक घेणार असल्याची माहिती मंत्री डॉ.उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य हेमंत रासने यांनी यासंदर्भात एक लक्षवेधी सुचनेद्वारे विचारणा केली असता मंत्री डॉ.सामंत यांनी उत्तर दिले.
मंत्री डॉ.सामंत यांनी सांगितले की, ८ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली यशदा येथे झालेल्या बैठकीत पुणे महानगरपालिकेला डीपीआर आणि मास्टर प्लॅन तयार करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. मात्र काही कालानंतर पुणे महानगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहून, आमच्याकडे आवश्यक यंत्रणा नसल्याने हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने करावे, अशी विनंती केली. त्यामुळे मुख्यमंत्री स्वतः पुढील १५ दिवसांत बैठक घेतील असे मंत्री डॉ.सामंत यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर