पोउनि आनंद श्रीमंगल यांच्या सतर्कतेमुळे शिरूर ताजबंद येथील मोठी दुर्घटना टळली!
लातूर, 11 डिसेंबर (हिं.स.)। ​अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात दिनांक १० डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दुकानांना अचानक आग लागल्याची गंभीर घटना घडली. मात्र, पोलीस उपनिरीक्षक (PSI) आनंद श्रीमंगल यांनी दाख
पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल यांच्या सतर्कतेमुळे शिरूर ताजबंद येथील मोठी दुर्घटना टळली!


लातूर, 11 डिसेंबर (हिं.स.)।

​अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात दिनांक १० डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दुकानांना अचानक आग लागल्याची गंभीर घटना घडली. मात्र, पोलीस उपनिरीक्षक (PSI) आनंद श्रीमंगल यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी टळली.

शिरूर ताजबंद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात अचानक ​आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ पोलीस मदत क्रमांक ११२ वर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. रात्रगस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल यांनी या माहितीची गंभीर दखल घेत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

​ गॅस सिलिंडर्सचा धोका टाळला

​ज्या दुकानांना आग लागली होती, त्यांच्या अगदी शेजारीच गॅस रिपेअरिंगचे दुकान होते. या दुकानात पाच ते सात भरलेले गॅस सिलिंडर्स असल्याची माहिती श्रीमंगल यांना मिळाली. हे सिलिंडर्स आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यास मोठा स्फोट होऊन परिसरातील अनेक दुकानांचे आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले असते.

​श्रीमंगल यांनी क्षणाचाही विलंब न लावता, तात्काळ दुकानाचे कुलूप फोडले आणि ते सर्व भरलेले गॅस सिलिंडर्स सुरक्षितपणे दुकानाच्या बाहेर काढले. यामुळे होणारा महाभयंकर स्फोट टळला आणि मोठी दुर्घटना होण्यापासून बचाव झाला.

​अग्निशमन दलाला पाचारण

​त्याच वेळी, श्रीमंगल यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

​या मदतकार्यात पोलीस अंमलदार केंद्रे, चालक पोउपनी देवकत्ते तसेच शिरूर ताजबंद येथील नागरिकांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल यांच्या या धाडसी आणि सतर्क कामगिरीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्यामुळेच शिवाजी महाराज चौकातील मोठी हानी टळू शकली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande