
लातूर, 11 डिसेंबर, (हिं.स.)। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (RBSK) सन २०२५-२६ मध्ये जिल्ह्यातील अंगणवाडी आणि शासकीय, निमशासकीय शाळांमधील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची व विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये हृदयरोग (हृदयदोष) आढळलेल्या २४ बालकांवर पुणे येथील विविध नामांकित रुग्णालयांमध्ये मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या उपचारांसाठी ही बालके नुकतीच पुणे येथे रवाना झाली.
या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात या बालकांच्या पालकांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या व धीर दिला.
आरोग्य उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडा, डॉ.आनंद कलमे तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
RBSK : लवकर निदान, वेळेवर उपचार
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांची वर्षातून दोन वेळा आणि ६ ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची वर्षातून एक वेळा आरोग्य तपासणी केली जाते. बालकांमध्ये आढळणारे जन्मतः असलेले व्यंग, लहान मुलांमधील आजार, जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारे आजार व दिव्यांगत्व याचे वेळीच निदान व उपचार होण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
या तपासणीसाठी जिल्ह्यात ३० पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
वर्ष २०२५-२६ मधील आरोग्य सेवांची आकडेवारी:
संशयित हृदयदोष २२४ बालके टू-डी एको तपासणी करण्यात आली.
हृदयरोग शस्त्रक्रिया ५६ बालके यापूर्वी मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.
सध्याची शस्त्रक्रिया २४ बालके पुणे येथे उपचारांसाठी रवाना.
दृष्टीदोष १,२९९ बालके पुढील उपचारासाठी संदर्भित.
दातांचा आजार ४,६०१ बालके पुढील उपचारासाठी संदर्भित.
तिरळेपणा ४७ बालके शस्त्रक्रिया करण्यात आली.
मोफत उपचाराने पालकांना मोठा दिलासा
सध्या शस्त्रक्रियेसाठी रवाना झालेल्या २४ बालकांवर पुणे येथील रुबी हॉल, ग्लोबल हॉस्पिटल, इनलॅक्स हॉस्पिटल येथे आवश्यक शस्त्रक्रिया होणार आहेत.
जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी सांगितले की, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत आरोग्य तपासणीमुळे बालकांमधील आजाराचे लवकर निदान व उपचार होणे शक्य होत आहे.
हृदयरोग असलेल्या बालकांवर मोफत उपचार करण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील पालकांना मोठा दिलासा मिळत आहे. जिल्ह्यात हा कार्यक्रम अधिक व्यापक स्वरुपात राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis