
चंद्रपूर, 11 डिसेंबर (हिं.स.)। नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरातील सुरू असलेल्या रेल्वे धरणे आंदोलनाचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित केला. काही दिवसांपूर्वी त्यांनी रेल्वे प्रवासी सेवा संघटनेतर्फे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देऊन प्रवाशांच्या सर्व मागण्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या होत्या. त्यावेळी दिलेल्या आश्वासनानुसार त्यांनी हा प्रश्न सभागृहात पुन्हा मांडत राज्य सरकारने या मागण्यांचा पाठपुरावा केंद्र शासनाकडे तातडीने करावा अशी मागणी केली.
सभागृहात बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले,चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवासी संख्या प्रचंड आहे. विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक तसेच उद्योग क्षेत्राच्या वाढत्या गरजांमुळे रेल्वे सुविधांचा विस्तार अत्यावश्यक झाला आहे. त्यामुळे या मागण्या केवळ प्रवासी संघटनांच्या नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या आहेत.
यावेळी त्यांनी चंद्रपूर–मुंबई दैनंदिन सुपरफास्ट सेवा, चंद्रपूर–नागपूर शटल सेवा, गोंदिया दुरंतो एक्स्प्रेसची सुरुवात चंद्रपूरहून करण्याची गरज, तसेच चंद्रपूर–कोलकाता अशी चंद्रपूरची माता महाकाली ते कलकत्ता ची महाकाली थेट रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव