
अमरावती, 11 डिसेंबर (हिं.स.)आगामी महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया वेगाने पुढे सरकत असून आगामी काही दिवसांत आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाला मोठा वेग आला आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी प्रलंबित असलेली महत्त्वाची विकासकामे पूर्ण करण्यासाठी विभागांकडून युद्धपातळीवर हालचाली सुरू आहेत.
प्रशासकीय मंजुरी, निविदा प्रक्रिया, निधी वितरण, तसेच सुरु असलेल्या कामांचे देयक निपटारा या बाबींना गती देण्यात येत असून अधिकारी व कर्मचारी यांना वेळेवर कामे पूर्ण करण्याचे निर्दे श देण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूला, राजकीय पक्षांनीही आगामी निवडणुकीची तयारी वेगाने सुरू केली आहे. उमेदवारी, प्रभागनिहाय रणनीती,बूथनिहाय संघटन या घडामोडींमध्ये पक्ष व्यग्र झाले असून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जनसंपर्क आणि संघटन मजबूत करण्यावर भर देत आहेत. आचारसंहिता लागू होताच प्रशासकीय व राजकीय हालचालींना नियमबद्ध कक्षेत काम करावे लागणार असल्याने दोन्ही स्तरावर सध्या 'रनिंग मोड' दिसत आहे. सध्या निवडणुकीपूर्वी कामे वेगात आटोपण्याची चुरस निर्माण झाली असून, आचारसंहिता कधीही लागू होऊ शकते, अशी चर्चा आहे.
निवडणूक आयोगाने यापूर्वी प्रथम जिल्हा परिषद व नंतर महानगरपालिका निवडणुका घेण्यात संदर्भातील सूचना दिल्या होत्या मात्र ऐनवेळी महापालिका निवडणुका पूर्वी घेतल्या जातील, असे कामकाजावरून दिसून येत असल्याने जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा मागे पडतील का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी