माळेगाव यात्रेत भाविकांना सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नियोजन करा - नांदेड जिल्हाधिकारी
नांदेड, 11 डिसेंबर (हिं.स.)। दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या लोहा तालुक्यातील श्री खंडोबा देवस्थान, माळेगाव येथील यात्रा दिनांक 18 ते 24 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून यात्रेत सर्व सुविधा उपलब्ध राहतील
Q


नांदेड, 11 डिसेंबर (हिं.स.)।

दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या लोहा तालुक्यातील श्री खंडोबा देवस्थान, माळेगाव येथील यात्रा दिनांक 18 ते 24 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून यात्रेत सर्व सुविधा उपलब्ध राहतील, यासाठी संबंधित सर्व विभागांनी सुक्ष्म नियोजन करून समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.

यात्रेच्या पहिल्या दिवशी म्हणजे 18 डिसेंबर रोजी देवस्वारी व पालखी पूजन होईल व दुसऱ्या दिवशी पशुप्रदर्शन व दुग्धस्पर्धा यांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात्रेच्या कालावधीत भाविकांसाठी आवश्यक सर्व सुविधा प्रशासनाच्यावतीने उपलब्ध करण्यात येणार आहेत. यात्रेच्या सोयीसुविधांबाबत पशुसंवर्धन, कृषी, पोलीस प्रशासन, बीएसएनएल, महावितरण, परिवहन, आरोग्य विभाग आदींच्या कामांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला.

या बैठकीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, अपर जिल्हाधिकारी रत्नदिप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गिरी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, उपआयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रविणकुमार घुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत , माळेगावचे सरपंच प्रतिनिधी हणमंत धुळगंडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आदीची उपस्थिती होती.

यात्रेत भाविकांना शासनाच्या योजनांची माहिती मिळावी म्हणून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, महाविस्तार ॲप, ॲग्रीस्टॅक, आयुष्यमान भारत, महिला व बाल विकास विभाग,पशूसंवर्धन विभाग यांचे स्टॉल उभारण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या.

तसेच भाविकांना इंटरनेट सेवा अखंडित मिळावी यासाठी बीएसएनएलने वायफाय व नेटवर्क व्यवस्थेचे विशेष नियोजन करावे, अशाही सूचना देण्यात आल्या.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande