
पुणे, 11 डिसेंबर (हिं.स.)। कुख्यात नीलेश घायवळ टोळीतील गुंड अजय सरवदेला बनावट कागदपत्रांच्या आधारे पिस्तूल परवाना मिळवून देणाऱ्या एजंट नीलेश फाटकने आणखी १५ जणांना परवाना मिळवून दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या सर्व परवान्यांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.फाटक याच्याविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा येरवडा पोलिसांकडे वर्ग केला आहे. चौकशीत फाटकने १५ जणांना पिस्तूल परवाना मिळवून देण्यास मदत केल्याचे समोर आले आहे.
घायवळ टोळीतील सराईत गुन्हेगार अजय सरवदेने १७ सप्टेंबर रोजी कोथरूड परिसरात एका तरुणावर कोयत्याने वार केले होते. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. सरवदेच्या घरावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांना चारशे काडतुसे मिळाली होती. तपासात त्याच्याकडे पिस्तुलाचा परवानाही असल्याचे समोर आले. त्याने पिस्तूल परवान्यासाठी बनावट रहिवासी पुरावा आणि खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. ही कागदपत्रे तयार करण्यासाठी एजंट फाटक याने सहकार्य केल्याचे समोर आले. या प्रकरणी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फाटक याने परवाने मिळवून दिलेल्या त्या १५ जणांची यादी तयार केली आहे. त्यांच्या परवान्यांच्या फाइल्स तपासासाठी मागविण्यात आल्या आहेत. संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून त्या सर्वांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु