
अमरावती, 11 डिसेंबर (हिं.स.)।ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचा सत्कार करण्यात आला. मुंबई येथील लोकभवनातील जय विहार येथे हा कार्यक्रम पार पडला. राज्यपाल यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र आणि स्मृती चिन्ह असे गौरवाचे स्वरूप आहे.सत्कारावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद पाठारकर उपस्थित होते. जिल्ह्याला २०२४-२५ या वर्षासाठी १ कोटी २३ लाख रूपयांचे लक्ष्य देण्यात आले. त्या तुलनेत १ कोटी ६४ रूपयांचा निधी संकलित करण्या आला. जिल्ह्याने निधी संकलनात अमरावती विभागात अव्वल स्थान पटकावले असल्याने हा सन्मान करण्यात आला. संकलित निधी माजी सैनिक आणि त्यांच्या अवलंबितांच्या कल्याणासाठी उपयोगात आणल्या जाणार आहे.जिल्ह्याने ध्वजदिन २०२४ साठी देण्यात आलेले उद्दिष्ट काही महिन्यांत पूर्ण केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी इष्टांकापेक्षा अधिक निधी गोळा केला आहे. यामुळे युद्धविधवा, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याण व पुनर्वसन, तसेच कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मदत होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी