
अमरावती, 11 डिसेंबर (हिं.स.) श्रीकृष्णाचे सासर व रुख्मिणी मातेचे माहेरघर आणि महाभारतातील पौराणिक असे तीर्थक्षेत्र असलेल्या कौंडण्यपूरचा महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गात समावेश झाला आहे.श्री अंबा रुक्मिणी सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष रविराज देशमुख यांच्या संकल्पनेतून २७ जून रोजी कौंडण्यपूर येथे आयोजित २११ मीटर साडी अर्पण सोहळ्यास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कौंडण्यपूर हे शक्तीपीठ महामार्गाला जोडण्याची घोषणा केली होती. यासंदर्भात रविराज देशमुख यांना पत्र प्राप्त झाले आहे.
नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग हा ८०२ किमी लांबीचा असून या महामार्गामुळे प्रवासाचा वेळ १३ तासांनी कमी होईल. नागपूर ते गोवा हे अंतर सध्या १ हजार ११० किमी आहे, ते आता ८०२ किमी होईल. हा महामार्ग महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमधून आणि गोव्यातील एका जिल्ह्यामधून जाईल. त्याचे व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) करणार आहे. महाराष्ट्रातील रस्तेमार्ग सुधारण्यासाठी राज्य सरकारने शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला. या महामार्गामुळे प्रवासाचा वेळ २१ तासांवरून ८ तासांपर्यंत कमी होईल असा दावा केला जात आहे. हा महामार्ग विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांना जोडेल. शिवाय हा महामार्ग महाराष्ट्रातील तीन शक्तिपीठांना जोडतो. या पीठांमध्ये महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि पत्रादेवी यांचा समावेश होतो.इतर तीर्थस्थळांमध्ये माहूर, पंढरपूर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, अंबाजोगाई, औदुंबर, गाणगापूर, अक्कलकोट, नरसोबाची वाडी, तख्त सचखंड श्री हुजूर साहिब (नांदेड) यासारखी १८ हून अधिक तीर्थस्थळे या महामार्गाने जोडली जातील. धार्मिक आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळे जोडल्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल.
जागतिक स्तरावर नावलौकिक : रविराज देशमुख या महामार्गामुळे प्रवासाचा सरासरी वेळ १८-२० तासांवरून फक्त ७-८ तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकांसाठी हा लाभदायक ठरणार आहे. या प्रदेशात रोजगाराच्या संधी वाढतील आणि काही काळापासून अडचणीत असलेल्या भागात अत्यंत आवश्यक सामाजिक-आर्थिक विकास होईल, विदर्भ राजकन्या श्री रुख्मिणी मातेचे माहेरघर असलेले श्री क्षेत्र कौंडण्यपूरचा या महामार्गात समावेश होणे म्हणजे गौरवाची बाब आहे, यामुळे कौंडण्यपूर नगरीला जागतिक स्तरावर नावलौकिक मिळेल तसेच कौंडण्यपूर नगरीचा झपाट्याने विकास होईल व स्थानिकांना मोठा रोजगार मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे मत रविराज देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी