
पुणे, 11 डिसेंबर, (हिं.स.)। शहरातील शंभर किलोंपेक्षा जास्त ओला कचरा निर्माण करणाऱ्या (बल्क वेस्ट जनरेटर) हॉटेल्स, रेस्टॉरंट, व्यापारी संकुले, संस्था, आस्थापना व सोसायट्यांमध्येच कचरा प्रक्रिया प्रकल्प राबविणे बंधनकारक आहे. त्याबाबत केलेल्या सर्वेक्षणामध्ये ६०० पेक्षा जास्त संस्था, सोसायट्यांमध्ये संबंधित प्रकल्प बंद पडल्याची माहिती पुढे आली आहे. संबंधित संस्था, सोसायट्यांना प्रकल्प तातडीने सुरू करण्याचा आदेश महापालिकेकडून दिला जाणार आहेत.
महापालिकेच्या हद्दीमधील १०० किलोंपेक्षा जास्त कचरा दररोज निर्माण करणाऱ्या संस्था, आस्थापना, सोसायट्यांसह अन्य संस्थांना ओला कचरा प्रक्रिया प्रकल्प राबविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार शहरामध्ये तब्बल दोन हजारांपेक्षा जास्त संस्था, सोसायट्यांकडे ओला कचरा प्रक्रिया प्रकल्प असल्याची माहिती पुढे आली होती. महापालिकेने संबंधित संस्था, सोसायट्यांमधील कचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करून सर्वेक्षण केले. त्यामध्ये ६०० पेक्षा जास्त संस्था, सोसायट्यांमधील कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद असल्याची माहिती महापालिकेस मिळाली आहे. दरम्यान, कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद असणाऱ्यांना त्यांचे प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्याचा आदेश महापालिकेने दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु