
भाजपसह काँग्रेस देखील मैदानात
छत्रपती संभाजीनगर, 11 डिसेंबर (हिं.स.)।
खुलताबाद नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत रंगली आहे. मतदान २ डिसेंबर रोजी शांततेत पार पडले. मूळतः मतमोजणी ३ डिसेंबरला होणार होती. मात्र हायकोर्टाच्या आदेशामुळे ती २१ डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षपदासाठी एकूण ९ उमेदवार मैदानात असूनही खरी लढत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्येच रंगत आहे. यात भाजप : परसराम बारगळ, राष्ट्रवादी काँग्रेस: हाजी अकबर बेग, काँग्रेस: आमेर पटेल, शिंदे शिवसेना : बाबासाहेब बारगळ, एमआयएम: इरफान शेख, अपक्ष: सलीम चौधरी, मोहंमद नइम बक्ष, अझहर चिश्ती, सवुत शेख यांचा समावेश होता.
तिन्ही प्रमुख पक्षांनी निवडणुकीत ताकद लावली. भाजपकडून आमदार प्रशांत बंब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार सतीश चव्हाण यांनी सना मलिक यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांनी खासदार इम्रान प्रतापगढी यांच्या सभेने प्रचारात रंग भरला होता.
तिन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. भाजपला रोखण्यासाठी आमदार सतीश चव्हाण यांनी प्रयत्न केले. राष्ट्रवादीला रोखण्यासाठी आमदार प्रशांत बंब यांनी ताकद लावली. या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis