
सोलापूर, 11 डिसेंबर (हिं.स.)।
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्ते इकडून तिकडे उड्या मारताना दिसत आहेत. अनेकांचा ओढा हा सत्तेत असलेल्या पक्षांकडे आहे. सोलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपकी बार 75 पार असा नारा दिला आहे. त्यातच विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सोलापूर मध्ये लक्ष घातल्याने वातावरण निर्मिती झाली आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीकडे आकर्षित झाले आहेत.त्यातच आता खासदार प्रणिती शिंदे यांचे समर्थक सोहेल कुरेशी यांचाही सहभाग असल्याची चर्चा रंगली आहे. सोहेल लवकरच हाती घड्याळ बांधणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी आगामी महापालिकेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच आता काँग्रेसचे अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष नजीब शेख हे सुद्धा राष्ट्रवादीत आले असल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. प्रभाग चौदा मध्ये मुस्लिम समाजाची मोठ्या प्रमाणात आणि निर्णायक मते आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी प्रभाग चौदा यंदा ताब्यात घेण्यासाठी सरसावली आहे.सोहेल कुरेशी हे काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून सोलापुरात परिचित आहेत. विजापूर वेस भागात सोहेल यांना मानणारा वर्ग आहे. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सोहेल यांनी पण निर्णय पक्का केल्याचे समजते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड