
जळगाव , 11 डिसेंबर (हिं.स.) जळगाव महापालिका निवडणुकीच्या तयारीत एक महत्त्वाचा टप्पा पार करत ७५० ईव्हीएम मशिन्सच्या बॅटरी आणि मेमरी कार्डांचा मोठा साठा महापालिकेत दाखल झाला. हैदराबाद येथील ECIL कंपनीमार्फत पाठविण्यात आलेले हे साहित्य मनपा प्रशासनाने व्हिडिओ चित्रणाच्या उपस्थितीत ताब्यात घेतले. ईव्हीएमसंबंधीच्या सर्व प्रक्रियांसाठी जबाबदार असलेल्या अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर आणि उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे यांच्या उपस्थितीत हे संपूर्ण साहित्य ट्रकमधून उतरविण्यात आले. निवडणूक प्रक्रियेनुसार कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून प्रत्येक यंत्राची स्थिती, क्रमांक, तसेच मेमरी व बॅटरींची कार्यक्षमता यांची काटेकोर तपासणी करण्यात आली. तपासणीची जबाबदारी नगररचना विभागाचे सहायक संचालक राजेश महाले, रचना सहायक अतुल पाटील, निवडणूक अधीक्षक दीपक फुलमोगरे आणि मनपातील नियुक्त कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली होती. सर्वांनी मिळून ७५० ईव्हीएमचे घटक एक-एक करून तपासले आणि त्यानंतर संपूर्ण साहित्य मनपाच्या स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षितरित्या सील करून ठेवण्यात आले. तसेच, इव्हीएम साहित्याची वाहतूक, उतरवणे आणि स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्यासाठी उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे, संदिप मोरे, अतुल पाटील, सुमित पाटील, शालीग्राम लहासे, भोजराज काकडे, अमोल पखाले, कैलास कोष्टी, संतोष सपकाळे या अधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी होती. मेमरी कार्ड व बॅटरी स्ट्रॉंग रूममध्ये दाखल झाल्याने आगामी महापालिका निवडणुकीसाठीची तांत्रिक तयारी आता अधिकृतरीत्या पूर्ण झाली असून पुढील निवडणूक प्रक्रियेला वेग मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर