
बीड, 11 डिसेंबर (हिं.स.)।
१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या सर्व शासकीय, निमशासकीयअधिकारी-कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी जुनी पेन्शन संघटनेकडून १२ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे महामोर्चा काढण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या पेन्शन जनक्रांती महामोर्चाचे नेतृत्व राज्याध्यक्ष वितेश खांडेकर करणार आहेत. याबाबत माहिती राज्य पदाधिकारी विष्णू आडे यांनी दिली.
केंद्र सरकारने युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केली आहे. या योजनेत पगारातून कपात होते. पेन्शन शेअर बाजारावर आधारित असल्याने निवृत्तीनंतर आर्थिक अस्थिरता निर्माण होते. त्यामुळे लाखो कर्मचारी या योजनेला विरोध करत आहेत. १९८२ मधील निश्चित लाभाच्या जुन्या पेन्शन योजनेची पुन्हा अंमलबजावणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. संघटनेच्या संघर्षातून फॅमिली पेन्शन, रुग्णता पेन्शन, ग्रॅच्युइटी, १० लाख सानुग्रह अनुदान, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी जाहिरात झालेल्या पण नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन, डीसीपीएस हिशेब व शासनाचा १४ टक्के हिस्सा मिळवून देण्यात आला आहे. या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन विष्णू आडे, रत्नाकर डोंगरे, सर्जेराव चव्हाण, अश्विनी गिरी, सुमंत सक्राते, माधव पंतोजी, रमेश खरात, ग्यानबा वागदकर, रविकुमार कुंभार आदींनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis