
पुणे, 11 डिसेंबर (हिं.स.)। महापालिकेने शहरातील पाच रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर सशुल्क पार्किंगसाठी निविदा काढल्या, मात्र शहराच्या प्रमुख दोन रस्त्यांसाठी प्रत्येकी एक निविदा दाखल झाली, तर उर्वरित तीन रस्त्यांसाठी एकही निविदा आली नाही. निविदेला मिळालेल्या थंड प्रतिसादामुळे महापालिका प्रशासनावर फेरनिविदा काढण्याची वेळ आली आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागांसह अन्य प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीची दिवसेंदिवस वाढणारी समस्या लक्षात घेऊन महापालिकेने शहरातील काही रस्त्यांवर सशुल्क पार्किंग व्यवस्था निर्माण करण्यासाठी २०१७ मध्ये ठराव केला होता. त्यास राजकीय पक्षांसह सामाजिक, स्वयंसेवी संघटना, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला होता. त्यानंतर, आता शहरातील पाच रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर सशुल्क पार्किंग सुविधा देण्यासाठीची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली होती. त्यामध्ये लक्ष्मी रस्ता, जंगली महाराज रस्ता-नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता), विमाननगर, बालेवाडी येथील हायस्ट्रीट व बिबवेवाडी रस्त्यावर सशुल्क पार्किंग सुविधा देण्यासाठी महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये पण जंगली महाराज रस्ता-फर्ग्युसन रस्ता, विमाननगर रस्ता या दोन रस्त्यांसाठी प्रत्येकी एका ठेकेदाराने निविदा भरली आहे, तर लक्ष्मी रस्ता, बालेवाडी हायस्ट्रीट, बिबवेवाडी रस्ता या तीन रस्त्यासाठी एकही निविदा महापालिकेकडे आली नाही. डिजिटल पेमेंट, सेन्सर लावणे यांसारख्या कारणांसह निविदा पूर्वगणन पत्रकापेक्षा कमी दराने येऊ नयेत, यासाठी पालिका प्रशासनाने घेतलेल्या काळजीमुळे निविदांना अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे महापालिकेकडून आता पुन्हा एकदा फेरनिविदा काढली जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु