
पुणे, 11 डिसेंबर (हिं.स.)।
पुणे शहर पोलिस दलाच्या २०२४-२५ च्या भरती प्रक्रियेत पोलिस शिपाई, वाहनचालक, बँडसमन आणि कारागृह शिपाई पदाच्या सुमारे दोन हजार जागांसाठी दोन लाख १९ हजार ९२७ अर्ज प्राप्त झाले आहेत.पुणे शहर पोलिस दलात यावर्षी आत्तापर्यंतची सर्वांत मोठी भरती होत आहे. या भरती प्रक्रियेत १७३३ पोलिस शिपाई, १०५ वाहनचालक, ३३ बँडस॒मन आणि कारागृह विभागातील १३० शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. परंतु ती सात डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली होती. या पदांसाठी दोन लाख १९ हजार ९२७ अर्ज प्राप्त झाले आहेत.राज्यात एकाच दिवशी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह अन्य ठिकाणी पोलिस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पोलिस शिपाई पदासाठी उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज केले असल्यास त्यांना एकाच ठिकाणी हजर राहावे लागणार आहे. त्यानुसार संबंधित उमेदवारांना शहराची निवड करावी लागेल. अर्जांची पडताळणी केल्यानंतर पात्र उमेदवारांना इ-मेलद्वारे कळविण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु