
पुणे, 11 डिसेंबर (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाने २०१८ मध्ये साहित्य खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली. माहिती अधिकार अर्जाला विद्यापीठानेच दिलेल्या उत्तरातून साहित्य खरेदीच्या मोठमोठ्या रकमा, त्यावर झालेला अवाजवी खर्चाचा तपशील स्पष्ट झाला असून, या बाबत चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी रुसा प्रकल्प व आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्पासाठीच्या साहित्य खरेदीसंदर्भात विद्यापीठाकडे माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागितली होती. आदिवासी विकास विभागाकडून मिळालेल्या ६ कोटी रुपयांच्या प्रकल्पात विद्यापीठाने किमान साडेतीन कोटी रुपये जास्तीचे खर्च केले आहेत.त्रयस्थ संस्थेमार्फत प्रकरणाची चौकशी करून संबंधितांना निलंबित करावे, अशी मागणी वेलणकर यांनी राज्याचे मुख्य सचिव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे केली.रुसा प्रकल्प व आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्पासाठीच्या साहित्य खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु