
पुणे, 11 डिसेंबर (हिं.स.)। निश्चित कोट्यापेक्षा अधिक पाणीवापर केल्याचा ठपका ठेवून पाणीपुरवठ्याच्या नियमांचे पालन न केल्याने महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणाने पुणे महापालिकेला पुन्हा ‘कारणे दाखवा’ नोटीस दिली आहे. प्राधिकरणाने वेळोवेळी केलेल्या सूचना, आदेशाचे उल्लंघन महापालिकेने केल्याचे नोटिशीमध्ये म्हटले आहे.
एका महिन्यात याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिकेला देण्यात आला आहे. प्राधिकरणाचे सचिव मल्लिकार्जुन धराने यांनी ही नोटीस बजाविली आहे.
पुणे शहरासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने सप्टेंबर २०१७ मध्ये वर्षाला ८.१९ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा मंजूर केला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०१८ मध्ये झालेल्या खडकवासला कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत महापालिकेला वार्षिक ११.५० टीएमसी पाणीसाठा मंजूर करण्यात आला. त्यानुसार महापालिकेला दररोज ८९२ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, याकडे दुर्लक्ष करून महापालिका सध्या दररोज १३५० एमएलडी पाणी उचलत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु