छ.संभाजीनगरात राष्ट्रीय हस्तशिल्प सप्ताह; एमजीएम विद्यापीठात प्रदर्शन व प्रात्यक्षीक
छत्रपती संभाजीनगर, 11 डिसेंबर (हिं.स.)। विकास आयुक्त (हस्तशिल्प) कार्यालय, वस्त्र मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने संपूर्ण देशात राष्ट्रीय हस्तशिल्प सप्ताह साजरा केला जात आहे. त्यानुसार हस्तशिल्प सेवा केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी एमजीएम विद
Q


छत्रपती संभाजीनगर, 11 डिसेंबर (हिं.स.)।

विकास आयुक्त (हस्तशिल्प) कार्यालय, वस्त्र मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने संपूर्ण देशात राष्ट्रीय हस्तशिल्प सप्ताह साजरा केला जात आहे. त्यानुसार हस्तशिल्प सेवा केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी एमजीएम विद्यापीठाच्या सहकार्याने एमजीएम विद्यापीठ परिसरात हस्तशिल्प कारागिरांसाठी दोन दिवसांचे प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित केला.

हा कार्यक्रम सर्व कला रसिक, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी खुला ठेवण्यात आला असून सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्रदर्शनाला भेट देता येणार आहे. या दोन दिवसीय विपणन आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमात विविध हस्तकला प्रकारातील कारागिरांनी सहभाग घेत आपली उत्पादने प्रदर्शित केली आणि प्रात्यक्षिकेही सादर केली.

प्रदर्शनात कारागिरांनी बाटिक पेंटिंग, बंजारा भरतकाम, धातू डाई तयार करणे, पितळी शिल्प, क्रोशिया वस्तू, बांबू शिल्प, जरी व भरतकाम, सोलापूरच्या सूती सजावटी वस्तू, टेराकोटा दागिने, लाखेच्या बांगड्या, पैठणी साड्या यांसारख्या विविध वस्तूंचे प्रदर्शन केले. तसेच लाखेच्या बांगड्या तयार करणे, धातू डाई बनविणे, क्रोशिया वस्तू बनविणे आणि बंजारा भरतकाम यांसारख्या शिल्पकलेची थेट प्रात्यक्षिकेही सादर केली. स्कूल ऑफ डिझाइनमधील विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेत टेराकोटा व सिरॅमिक मातीची भांडी, हाताने छापलेल्या टी-शर्ट्स, प्रिंट मेकिंग कला आणि इंटेरियर डिझाइनशी संबंधित उत्पादने प्रदर्शित केली.

कार्यक्रमाचे उद्घाटन एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विलास सपकाळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. यावेळी कुलसचिव डॉ. आशीष गाडेकर, स्कूल ऑफ डिझाइनच्या अधिष्ठाता सुभा महाजन, डॉ. प्राप्ती देशमुख तसेच शिल्पगुरू आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते कारागीर रमाकांत रूपचंद सूर्यवंशी उपस्थित होते. कार्यक्रमाविषयीची माहिती हस्तशिल्प सेवा केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथील सहाय्यक संचालक अमनकुमार जैन यांनी दिली.

या कार्यक्रमाचा उद्देश हस्तशिल्प सप्ताह साजरा करणे, महाराष्ट्रातील विविध हस्तकला प्रकारांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि सहभागी पारंपरिक हस्तशिल्प कारीगरांच्या कौशल्याचा गौरव करणे हा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande