
सोलापूर, 11 डिसेंबर (हिं.स.)। सोलापूर जिल्हा कारागृह व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, राज्य मानवी हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्हा कारागृहात आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस साजरा केला गेला. मुख्य न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या सहमतीने व महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या आदेशानुसार, महाराष्ट्रातील सर्व कारागृहांमध्ये बंदींच्या मानवी हक्कांचे संरक्षण व जागृती करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात धर्मादाय आयुक्त ईश्वर सुर्यवंशी, महाराष्ट्र राज्य जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव प्रशांत पेटकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, कारागृह अधीक्षक सुशील कुंभार, पोलीस उपअधीक्षक राजन माने व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे, सुहास वारके यांच्या मार्गदर्शनाखाली, विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई आणि उपमहानिरीक्षक सुनिल ढमाळ यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. धर्मादाय आयुक्तांनी भारतीय राज्यघटनेने दिलेल्या हक्कांची माहिती देताना बंदी बांधवांना मार्गदर्शन केले. कारागृह अधीक्षक सुशील कुंभार यांनी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस साजरा करण्याचा उद्देश स्पष्ट केला आणि बंदींच्या सुविधांविषयी सविस्तर माहिती दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड