
परभणी, 11 डिसेंबर, (हिं.स.)। पतंग उडवण्याचा हंगाम सुरू होताच शहरात आणि ग्रामीण भागात पतंग व मांजाच्या विक्रीची लगबग वाढली आहे. मात्र नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांच्या घटना लक्षात घेता, नायलॉन मांजा वापरणारे तसेच त्याची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची सूचना पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दिली आहे.
पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, नायलॉन मांजामुळे सायकल, मोटारसायकलस्वारांचे गळे कापण्याच्या, गंभीर दुखापती होण्याच्या आणि प्रसंगी जीव धोक्यात येण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे नायलॉन मांजा वापरणे म्हणजे थेट नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणे होय.
नायलॉन मांजावरील बंदी प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी परभणी पोलीस दलाने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी शहरातील विविध पतंग विक्रेत्यांच्या दुकानांवर अचानक झाडाझडती घेतली. नायलॉन मांजाचा साठा आढळल्यास तत्काळ गुन्हे नोंदवून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
संपूर्ण जिल्ह्यात अशाप्रकारच्या तपासण्या सुरू राहणार असून, कोणीही नियमबाह्य कृत्य करून कारवाई ओढवून घेऊ नये, असे आवाहनही पोलीस अधीक्षकांनी केले आहे. नागरिकांनी पारंपरिक मांजाचा वापर करून सुरक्षितपणे पतंगबाजीचा आनंद घ्यावा, असे आवाहन करत पोलीस प्रशासनाने सर्वांना सहकार्याची विनंती केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis