
बीड, 11 डिसेंबर (हिं.स.)।
डोईठाण-आष्टी रस्त्यावर दोन बिबट्यांचा 'नाइट वॉक'; शेतकरी, प्रवाशांमध्ये दहशत
तालुक्यातील किन्ही गावाजवळ रहदारीच्या रस्त्यावर एकाच वेळी एक-दोन नव्हे तर तब्बल तीन बिबटे आढळून आल्यामुळे प्रवाशांच्या मनात मोठी धडकी भरली आहे. एका प्रवाशाने प्रसंगावधान राखून आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेला हा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ऑक्टोबर महिन्यात याच परिसरात बिबट्याने एका शेतकऱ्याचा बळी घेतल्यामुळे नागरिकांमध्ये आता प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
मंगळवारी रात्रीच्या सुमारास डोईठाण-आष्टी रस्त्यावरील किन्ही
गावाजवळच्या पुलाजवळ एका प्रवाशाला अचानक तीन बिबटे रस्त्यावर दिसले. प्रवासी बिबट्यांना
पाहून घाबरले, मात्र त्यांनी प्रसंगावधान राखून बिबट्यांची हालचाल आपल्या कॅमेऱ्यात कैद
केली. हे बिबटे काही वेळ रस्त्यावर फिरून बाजूच्या शेतात निघून गेले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.
या बिबट्यांच्या दर्शनामुळे परिसरातील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे, कारण ऑक्टोबर महिन्यात याच परिसरात एका शेतकऱ्याचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला होता. १३ ऑक्टोबर रोजी बावी गावात राजेंद्र विश्वनाथ गोल्हार (वय ३६) हे शेतकरी जनावरं घेऊन शेतात गेले
असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला करत त्यांचा फडशा पाडल्याची दुर्दैवी घटना घडली होती.
या घटनेची कटू आठवण ताजी असतानाच आता तीन बिबटे दिसल्यामुळे बीडसांगवी, कोहिणी, बावी, दरेवाडी, किन्ही आणि परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आणि फिरताना अत्यंत काळजी घेण्याचे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. वन विभागाने तातडीने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis