
सोलापूर, 11 डिसेंबर (हिं.स.)। उजनी धरण सध्या १०० टक्के भरलेले आहे. उजनीतील उपलब्ध पाण्याचे या वर्षाचे अंतिम नियोजन कालवा सल्लागार समितीत ठरणार आहे. पण, शेतीसाठी १५ जानेवारीनंतर उजनी धरणातून पहिले आवर्तन सोडले जाणार आहे. सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी समांतर जलवाहिनी झाल्यामुळे यंदा शेतीसाठी उन्हाळ्यात एक वाढीव आवर्तन मिळणार आहे.सोलापूर जिल्ह्यात यंदा दोन लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. उजनी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून जिल्ह्यातील एक लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्राला थेट पाणी पोचते. अतिवृष्टी व महापुरामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना रब्बीच्या पिकांमधून चांगल्या उत्पन्नाची आशा आहे.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना १५ जानेवारी ते १५ जून या सहा महिन्यांत तीन वेळा उजनीतून पाणी सोडले जाणार आहे. याशिवाय भीमा नदीतून देखील दोन आवर्तने सोडले जातील, असे नियोजन करण्यात आले आहे. त्यावर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल, असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड