
जळगाव, 11 डिसेंबर (हिं.स.) शहरातील वाहतूक शिस्तीला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी बुधवारी विशेष मोहीम राबवत वाहतूक नियम मोडणाऱ्या ६३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. याशिवाय परवाना नसताना दुचाकी चालवणारे १५ अल्पवयीन मुलांना दुचाकीसह वाहतूक शाखेत आणून त्यांच्या पालकांना समज देण्यात आली.
जळगाव शहरात विना हेल्मेट, ट्रिपल सीट, विना परवाना तसेच इतर विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिल्या आहेत. त्यानुसार वाहतूक शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक संजय गायकवाड व त्यांच्या पथकाने शहरातील विविध भागात तपासणी मोहीम राबवली. दरम्यान, महाविद्यालये व क्लासेस परिसरातही विशेष लक्ष ठेवत अल्पवयीन दुचाकीस्वारांना रोखण्यात आले. एकूण १५ मुलांना दुचाकीसह पोलिसांनी वाहतूक शाखेत आणून त्यांच्या पालकांना पाचारण केले. पहिल्यांदाच नियमभंग झाल्याने त्यांना समज देऊन सोडण्यात आले. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही नियमित कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर