सरकार-प्रशासनाच्या संगनमताने राज्यातील देवस्थानांच्या भूमीत मोठा घोटाळा ! - वडेट्टीवार
* महाराष्ट्रातील देवस्थानच्या भूमीविषयी श्वेतपत्रिका काढावी ! नागपूर, ११ डिसेंबर (हिं.स.) - ‘राज्यात देवस्थानच्या भूमीत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला असून त्याची श्वेतपत्रिका काढावी’, अशी मागणी काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी ११
सरकार-प्रशासनाच्या संगनमताने राज्यातील देवस्थानांच्या भूमीत मोठा घोटाळा ! - वडेट्टीवार


* महाराष्ट्रातील देवस्थानच्या भूमीविषयी श्वेतपत्रिका काढावी !

नागपूर, ११ डिसेंबर (हिं.स.) - ‘राज्यात देवस्थानच्या भूमीत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला असून त्याची श्वेतपत्रिका काढावी’, अशी मागणी काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी ११ डिसेंबर या दिवशी विधानसभेत केली. ‘हैद्राबाद इनामे आणि रोख अनुदाने रहित सुधारणा विधेयका’वर बोलतांना त्यांनी ही मागणी केली. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘हैदराबाद रोख आणि इनामे सुधारणा विधेयक’ विधान सभेत मांडले, त्यावर चर्चा चालू असतांना वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात नुकताच मुंढवा भूमी प्रकरण झाले. यात सरकारची महार वतनाची भूमी देण्यात आली; मात्र कुणावर कारवाई झाली, कुणावर नाही यावर नंतर चर्चा होईल; पण अशाच पद्धतीने देवस्थानच्या ५० टक्के जागा या हेराफेरी करून देण्यात आल्या आहेत. प्रशासन आणि राजकीय नेत्याच्या संगनमताने कागदात फेरफार करून भूमीची विल्हेवाट लावली जाते. हे गंभीर आहे. त्यामुळे देवस्थानच्या भूमीविषयी श्वेतपत्रिका काढावी. अशाच पद्धतीने निजाम कालीन इनाम भूमी ही एका खासदाराने आपल्या चालकाच्या नावाने घेतल्याचे वृत्त होते. १५९ कोटी रुपयांची भूमी लाटली की घेतली ? असे अनेक भ्रष्टाचार होत असल्याने उर्वरित महाराष्ट्रातील भूमीविषयी सरकारने श्वेतपत्रिका काढावी.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande