
मुंबई, 11 डिसेंबर (हिं.स.)। जेएसडब्ल्यू पेंट्स लिमिटेडने (“जेएसडब्ल्यू पेंट्स”) आज अक्झो नोबेल एन.व्ही. आणि तिच्या संलग्न कंपन्यांकडून अक्झो नोबेल इंडिया लिमिटेड (“एएनआयएल”) मधील प्रमुख 60.76% भागभांडवल संपादित केले. जेएसडब्ल्यू पेंट्सने खुल्या प्रस्तावाची यशस्वी पूर्तता करून 'एएनआयएल'च्या सार्वजनिक भागधारकांकडून आधीच 0.44% भागभांडवल संपादित केले आहे. आजच्या संपादनानंतर जेएसडब्ल्यूचा हिस्सा 61.2% झाला आहे.
जेएसडब्ल्यू पेंट्स ही भारतातील सर्वात वेगाने वाढणारी पेंट्स कंपनी आहे आणि ती 23 अब्ज डॉलर्सच्या जेएसडब्ल्यू समूहाचा एक भाग आहे. जेएसडब्ल्यू समूह हा भारतातील एक अग्रगण्य समूह असून पोलाद, सिमेंट, ऊर्जा, पायाभूत सुविधा, ऑटोमोटिव्ह आणि पेंट्स यांसारख्या विविध B2B आणि B2C क्षेत्रांमध्ये विस्तार झाला आहे. भारतातील सजावटीच्या आणि औद्योगिक पेंट्स क्षेत्रातील अनिल (ANIL) ही एक अग्रगण्य कंपनी आहे. आणि नेदरलँड्समध्ये मुख्यालय असलेल्या, सजावटीच्या पेंट्स आणि औद्योगिक कोटिंग्समधील जागतिक अग्रणी असलेल्या अक्झो नोबेलचा ती एक भाग होती.
या व्यवहारामुळे या क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांमध्ये जेएसडब्ल्यू पेंट्सची गणना होईल. विशेष म्हणजे, आगामी वर्षांमध्ये या क्षेत्रात भरीव वाढ होण्याची अपेक्षा आहे.
जेएसडब्ल्यू ग्रुपचे चेअरमन श्री. सज्जन जिंदाल म्हणाले, “अक्झोनोबेल इंडिया टीमचे जेएसडब्ल्यू परिवारात स्वागत करताना मला आनंद होत आहे. भारताकडे विश्वासार्ह आणि जागतिक दर्जाचे पेंट्स तसेच कोटिंग्ज असायला हवेत, असा आमचा विश्वास आहे. ड्युलक्सच्या माध्यमातून, देशभरातील घरे आणि उद्योगांपर्यंत जागतिक दर्जाची उत्पादने पोहोचवण्याचा आम्हाला अभिमान वाटतो. एकत्रितपणे आमच्या ग्राहकांसाठी आणि भारतासाठी एक मजबूत, उज्ज्वल आणि अधिक रंगीत भविष्य घडवण्याची येथे एक अविश्वसनीय संधी आहे.”
जेएसडब्ल्यू पेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. पार्थ जिंदाल म्हणाले, “अक्झो नोबेल इंडियाचे जेएसडब्ल्यू परिवारात स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. भारतातील पेंट्स आणि कोटिंग्ज बाजारपेठेतील सर्वात मोठ्या अधिग्रहणांपैकी हे एक असल्याने ही ऐतिहासिक घटना आहे. कर्मचारी, ग्राहक आणि भागीदार यांचा समावेश असलेल्या अक्झो नोबेल इंडिया परिवारासोबत आम्ही भविष्याच्या दृष्टीने पेंट कंपनी उभारण्याचे ध्येय बाळगतो. ड्युलक्सच्या जादूने आणि जेएसडब्ल्यू पेंट्सच्या विचारप्रक्रियेने, आम्ही ग्राहकांना आनंदित करण्यास तसेच आमच्या भागधारकांसाठी चिरस्थायी मूल्य निर्माण करण्यास उत्सुक आहोत.”
अक्झोनोबेलचे सीईओ श्री. ग्रेग पौक्स-गिलाउम म्हणाले, “आमच्या धोरणात्मक उद्दिष्टांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या आणि अक्झोनोबेलला दीर्घकालीन मूल्य निर्मितीसाठी सज्ज करण्याच्या दिशेने आजचा हा करार म्हणजे एक महत्त्वाचे पाऊल आहे. भारतातील आमच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. देशातील वेगाने वाढणाऱ्या पेंट्स आणि कोटिंग्जच्या बाजारपेठेतील एक मजबूत आणि वचनबद्ध भागीदार असलेल्या जेएसडब्ल्यूकडे हा व्यवसाय हस्तांतरित होत असल्याचे पाहून आम्हाला आनंद होतो आहे.”
मॉर्गन स्टॅनलीने या व्यवहारात जेएसडब्ल्यू पेंट्ससाठी विशेष वित्तीय सल्लागार म्हणून काम केले. खेतान अँड कंपनीने यात कायदेशीर सल्लागार म्हणून काम केले. तर डेलॉइटने वित्तीय आणि करविषयक ड्यू डिलिजन्स सल्लागार म्हणून काम केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर