
नागपूर, 11 डिसेंबर (हिं.स.) - श्रीक्षेत्र तुळजापूर येथील प्राचीन ब्रह्मदेवाची मूर्ती भंगल्याप्रकरणी दोषी अधिकार्यांवर गुन्हे नोंद करावे, तसेच श्री तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात मंदिर रचनेत कोणतेही पालट न करता आराखड्यात कुलाचार, वंशपरंपरा आणि अन्य धार्मिक कृतीसाठी जागा ठेवण्यात यावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना विधानभवनात देण्यात आले. या वेळी प्रताप सरनाईक यांनी धाराशिव येथील जिल्हाधिकार्यांना फोन करून या प्रकरणी चौकशी करून त्याचा अहवाल त्वरित मला सादर करावा, असा आदेश दिले. या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री अतुल अर्वेन, अभिजीत पोलके उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, श्री तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे काम चालू होण्यापूर्वीच मंदिर परिसरातील अनेक उपदेवतांची मूर्ती हलवण्यात आल्या आहेत. मंदिराची रचना पालटाची कामे चालू करतांना कोणतीही योग्य ती काळजी न घेतल्याने प्राचीन श्री ब्रह्मदेवाची मूर्ती निष्काळजीपणामुळे दुभंगली आहे. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. याविषयी अनेक स्थानिक संघटना, नागरिक यांनी तक्रारी करूनही गेली अडीच महिने दोषी शासकीय अधिकार्यांवर अद्याप गुन्हे का नोंद झाले नाही ? या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे नोंद करावेत, तसेच आराखड्याच्या धार्मिक दृष्टीकोनातून आढावा घेण्यासाठी धर्मशास्त्राचे अभ्यासक, धर्माचार्य आणि शंकराचार्य पिठांचे विचार जाणून घेणे अत्यावश्यक आहे. मुख्य प्रवेशद्वारे पूर्वीप्रमाणेच ठेवावे. मागून नवीन द्वार सिद्ध करून मंदिराची रचना पालटू नये, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी