मुख्‍यमंत्री फडणवीस यांना ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार’ जाहीर
अमरावती, 13 डिसेंबर, (हिं.स.)। श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार’ यंदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर झाला आहे. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच
मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार’, श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे घोषणा


अमरावती, 13 डिसेंबर, (हिं.स.)।

श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार’ यंदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर झाला आहे. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२७ व्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून २७ डिसेंबर २०२५ रोजी अमरावतीत होणाऱ्या मुख्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ५ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार असून मुख्यमंत्र्यांनी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे, असे हर्षवर्धन देशमुख यांनी सांगितले.

या सोहळ्याला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके, आमदार संजय खोडके, आमदार प्रताप अडसड आणि आमदार रणधीर सावरकर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.जयंती महोत्सवात विदर्भातील शेतकऱ्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिलेल्या निधीतून शेतीक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी महिलेला ‘शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार’, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निधीतून पुरूष शेतकऱ्याला ‘स्व. शरद जोशी उत्कृष्ट पुरूष शेतकरी पुरस्कार’ देण्यात येणार आहे. १ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप असून निवड समितीतर्फे लवकरच विजेत्यांची नावे घोषित केली जातील.

याशिवाय ‘श्रीमती विमलाबाई देशमुख (वैद्यकीय शिक्षण अभ्यासवृत्त्ती)’, ‘क्रातिज्योती सावित्रीबाई फुले (कृषी शिक्षण) अभ्यासवृत्ती’ दिली जाणार आहे. क्रीडा क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल कस्तुरबा कन्या शाळेची विद्यार्थिनी भक्ती गजानन चौधरी हिला डॉ. पंजाबराव देशमुख क्रीडारत्न पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

विकासाभिमुख नेतृत्वाचा गौरव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुरस्कार प्रदान करण्यामागील भूमिका संस्थेने स्पष्ट केली. फडणवीस यांनी मराठा, ओबीसी आणि मागासवर्गीय समाजासाठी विविध कल्याणकारी योजना राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले आहे. ‘जलयुक्त शिवार’च्या माध्यमातून दुष्काळमुक्तीचा प्रयत्न, समृद्धी महामार्गासारखे प्रकल्प, गडचिरोलीतील नक्षलवाद नियंत्रणात आणून विकासाला दिलेली चालना, या त्यांच्या कारकीर्दीतील महत्वपूर्ण बाबींची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande