
• लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शन
लातूर, 13 डिसेंबर (हिं.स.)।
जवळपास सहा दशके आपल्या सुसंकृत राजकारणाने जनसेवा करणारे लातूर जिल्ह्याचे सुपुत्र शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवावर आज वरवंटी (ता. लातूर) येथे शासकीय इतमामात, मंत्रोच्चारात अंत्यसंस्कार करण्यात आले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी पुष्पचक्र अर्पण करून शिवराज पाटील चाकूरकर यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच पोलीस दलाच्या जवानांनी यावेळी बंदुकीच्या फैरींची सलामी देऊन मानवंदना दिली.
तत्पूर्वी सकाळी देवघर निवासस्थानी शिवराज पाटील यांच्या पार्थिवाला पोलीस दलातर्फे मानवंदना दिल्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात झाली. फुलांनी सजविलेल्या रथातून त्यांचे पार्थिव औसा रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पीव्हीआर चौकमार्गे वरवंटी येथे पाटील चाकूरकर कुटुंबियांच्या शेतामध्ये आणण्यात आले. याठिकाणी शोकाकुल जनसमुदायाच्या उपस्थितीत शिवराज पाटील चाकूरकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिवराज पाटील चाकूरकर यांचे पुत्र शैलेश पाटील चाकूरकर, स्नुषा डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यासह कुटुंबियांचे सांत्वन केले.
कर्नाटक राज्याचे वनमंत्री ईश्वर खंड्रे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, खासदार डॉ. भागवत कराड, अखिल भारतीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आदींनी यावेळी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
शिवराज पाटील चाकूरकर यांनी आपल्या ६० दशकांच्या राजकीय, सामाजिक जीवनात प्रामाणिकपणे देशाची सेवा केली. लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेची प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी भरीव योगदान दिले केला, संसदीय परंपरेला नवा आयाम दिला. संसदीय समित्यांसाठी त्यांनी पुढाकार घेतला. राजकारणातील त्यांचे योगदान नेहमीच स्मरणात राहील, अशा शब्दात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असल्याचे सांगून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ म्हणाले की, राष्ट्रासाठी समर्पित भावनेने काम करणारा आणि लोकशाहीला मजबूत बनविण्यासाठी प्रयत्न करणारा एक विनम्र राजकारणी आपण गमावला आहे. त्यांच्या निधनाने मोठे नुकसान झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासोबत १९६७ पासून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी विविध पदांवर काम करताना समाजाची सेवा करत विकासासाठी भरीव योगदान दिले. त्यांची उणीव सदैव भासत राहील, असे राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यावेळी म्हणाले.
चिंतनशील राजकारणी अशी ओळख असलेले शिवराज पाटील चाकूरकर हे आपल्यासाठी एक मार्गदर्शक, एक आदर्श होते. त्यांनी केंद्र सरकारमध्ये विविध मंत्री पदे भूषवत देशाची सेवा केली. लोकसभा अध्यक्ष असताना त्यांनी केलेले काम संस्मरणीय होते, असे सांगून कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी त्यांना कर्नाटक सरकारच्यावतीने श्रद्धांजली अर्पण केली.
शिवराज पाटील चाकूरकर यांनी नगरपरिषदेचे अध्यक्ष ते लोकसभेचे अध्यक्ष पदापर्यंतच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. अतिशय शिस्तप्रिय आणि वैचारिक मूल्य असणारे राजकारण, सर्वांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध हे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या राजकीय जीवनाचे वैशिष्ट्य होते. त्यांचे आपल्यातून निघून जाणे अतिशय वेदनादायी असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले.
गेली सहा दशके राज्याची, देशाची प्रामाणिकपणे सेवा करताना शिवराज पाटील चाकूरकर यांनी शेतकरी, कष्टकरी, महिला, सुशिक्षित युवा वर्ग यांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी आपल्या पदांचा उपयोग केला. ते एक अजातशत्रू, चिंतनशील, अभ्यासू व तत्वनिष्ठ राजकारणी होते. त्यांची उणीव सर्वांना जाणवेल, अशी भावना माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केली.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis