
जळगाव, 13 डिसेंबर (हिं.स.) | सोन्यासह चांदी दरात चढ उतार सुरूच असून आठवड्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही धातुंमध्ये घसरण झाली आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसात सोन्याला उतरती कळा लागल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र अद्यापही सोने आणि चांदीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे. शनिवार १३ डिसेंबर रोजी सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २७० रुपयांनी घसरले आहेत. यानंतर २४ कॅरेट १० ग्रॅम सोने खरेदीसाठी ग्राहकांना १,३३,९१० रुपये मोजावे लागणार आहे. सोबतच २२ कॅरेट सोन्याचे दरदेखील घसरले आहे. यामध्ये प्रति तोळ्यामागे २५० रुपयांची घसरण होऊन ते १,२२,७५० रुपयावर आले आहे सोन्यासह चांदी दरातही घसरण झाली आहे.
चांदीचे दर गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. काल चांदीचे दर इतिहासात पहिल्यांदाच २ लाखांपेक्षा जास्त होते. आता या दरात ६००० रुपयांनी घट झाली आहे. चांदीचे दर काल २,०४,००० रुपये होते. हेच दर आज १,९८,००० रुपये झाले आहेत. सोने आणि चांदी दोन्हीचेही दर घसरल्याने आज दागिने खरेदी करायची योग्य वेळ असल्याचे म्हणायला हरकत नाही. दरम्यान, हे दर कमी झाले असले तरीही अजून १ लाख ३० हजारांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीयांना हे दर परवडणारे नाहीत. हे दर अजून कमी करण्याची अपेक्षा सर्वसामान्यांना आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर