
मुंबई, 14 डिसेंबर (हिं.स.)। या वर्षात गुगल, ओपनएआय, परप्लेक्सिटी यांसारख्या अनेक टेक कंपन्यांनी एआय-पावर्ड ब्राउझर लाँच केले किंवा चॅटबॉट्स थेट विद्यमान ब्राउझरमध्ये इंटीग्रेट केले आहेत. मात्र या सगळ्यात गुगलच्या क्रोम टीमने सादर केलेला ‘डिस्को’ हा जेमिनी ३-पावर्ड नवा ब्राउझर विशेष लक्ष वेधून घेत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ‘डिस्को’ मॉडर्न वेबसाठी ब्राउझिंग आणि वेबवर काहीतरी तयार करण्याची पद्धत नव्याने विचारात घेऊन डिझाइन करण्यात आला आहे.
पारंपरिक ब्राउझर केवळ इंटरनेट सर्फिंगची सुविधा देतात, पण ‘डिस्को’ त्यापेक्षा वेगळा अनुभव देतो. हा ब्राउझर ‘GenTabs’ या टूलचा वापर करतो. यामध्ये वापरकर्त्याने दिलेल्या क्वेरी किंवा प्रॉम्प्टनुसार संबंधित टॅब्स आपोआप उघडले जातात आणि त्याचबरोबर वापरकर्ता जे करायचा प्रयत्न करतो, त्यासाठी एक कस्टम अॅप देखील तयार होते. उदाहरणार्थ, जर एखाद्याने ट्रॅव्हल टिप्स विचारल्या, तर ‘डिस्को’ स्वतःहून एक ट्रॅव्हल प्लॅनर अॅप तयार करतो.
विद्यार्थ्यांसाठीही हा ब्राउझर उपयुक्त ठरू शकतो. एखाद्या विशिष्ट विषयाचा अभ्यास करताना ‘GenTabs’ माहितीचे व्हिज्युअलायझेशन करणारे अॅप तयार करतो, ज्यामुळे संकल्पना अधिक सोप्या पद्धतीने समजून घेता येतात. जरी असे फीचर्स ChatGPT, Gemini आणि इतर एआय चॅटबॉट्समध्येही पाहायला मिळतात, तरी ‘डिस्को’ला वेगळे बनवणारी खास बाब म्हणजे त्याचे पर्सनलायझेशन. हा ब्राउझर वापरकर्त्याच्या ब्राउझिंग आणि चॅट हिस्ट्रीमधील माहितीचा वापर करून जेमिनी ३च्या मदतीने त्वरित वैयक्तिक अनुभव तयार करतो.
गुगलच्या माहितीनुसार, एकदा ‘डिस्को’ने एखादे अॅप तयार केले की, ते नॅचरल लँग्वेज प्रॉम्प्ट्स वापरून आणखी फाइन-ट्यून करता येते आणि GenTabs मध्ये वापरलेल्या सोर्सेसचे लिंकही दिले जातात. सध्या ‘डिस्को’ वापरून पाहण्यासाठी Google Labs पेजवर वेटलिस्टमध्ये नाव नोंदवावे लागेल. हा ब्राउझर आत्ता फक्त macOS वर उपलब्ध आहे. कंपनीने हेही स्पष्ट केले आहे की ‘डिस्को’मधून तयार होणाऱ्या कल्पना भविष्यात Google च्या इतर प्रॉडक्ट्समध्ये समाविष्ट होऊ शकतात, मात्र हा ब्राउझर सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी कधी उपलब्ध होईल, हे अद्याप निश्चित नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule