रिंकू राजगुरूची 'आशा' १९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई, 14 डिसेंबर (हिं.स.)। काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘आशा’ चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. ‘बाई अडलीये…म्हणूनच ती नडलीये’ ही प्रभावी आणि अर्थपूर्ण टॅगलाईन ट्रेलरची जाणीव अधिक ठळक करते. महिलांच्या
Rinku


मुंबई, 14 डिसेंबर (हिं.स.)। काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘आशा’ चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. ‘बाई अडलीये…म्हणूनच ती नडलीये’ ही प्रभावी आणि अर्थपूर्ण टॅगलाईन ट्रेलरची जाणीव अधिक ठळक करते. महिलांच्या संघर्षांचा, त्यांच्या जिद्दीचा आणि समाजाशी सुरू असलेल्या लढ्यांचा संवेदनशील, वास्तववादी प्रवास ‘आशा’ या चित्रपटातून उलगडताना दिसतो.

ट्रेलरमध्ये रिंकू राजगुरूने साकारलेली ‘आशा’ ही केवळ एक व्यक्तिरेखा न राहाता, ती अनेक स्त्रियांची प्रतीक ठरते. गावोगावी लोकांच्या आरोग्याची जबाबदारी पेलणारी आरोग्य सेविका, कुटुंबातील ताणतणावांना सामोरं जाणारी स्त्री, अन्यायाविरोधात ठाम उभी राहाणारी योद्धा आणि स्वतःचं ध्येय साध्य करण्यासाठी न थकता झगडणारी व्यक्ती. आशाचे हे सगळे पैलू ट्रेलरमध्ये प्रभावीपणे दिसतात. तिच्या आयुष्यातील धग, वेदना आणि तळमळ प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे.

या चित्रपटातील ‘चालत रहा पुढे’ हे प्रेरणादायी गाणंही सध्या चर्चेत आहे. आशाच्या संघर्षाला ऊर्जा देणारं हे गाणं सोशल मीडियावर भरभरून दाद मिळवत असून अनेकांसाठी ते प्रेरणेचा सूर ठरत आहे.

रिंकू राजगुरूसह या चित्रपटात सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. सामाजिक वास्तव, महिलांवर येणारे कठोर निर्णय, भावनिक दडपण आणि अस्मितेची लढाई यांचा प्रभावी संगम या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘आशा’ ही केवळ एका आरोग्य सेविकेची कथा नसून, दररोज विविध स्तरांवर झगडणाऱ्या लाखो महिलांची कहाणी आहे, हेच या चित्रपटाचं मोठं वैशिष्ट्य ठरतं.

चित्रपटाचे दिग्दर्शक दिपक पाटील म्हणतात, '' 'आशा' हा केवळ एका आरोग्य सेविकेचा प्रवास नाही. ती त्या लाखो स्त्रियांची प्रतिनिधी आहे, ज्या आयुष्यभर इतरांसाठी झिजतात, स्वतःच्या भीतींवर मात करतात आणि कुठल्याही परिस्थितीत हार मानत नाहीत. या चित्रपटातून आम्ही त्या अनामिक योद्ध्यांना प्रकाशात आणू इच्छितो.”

दिग्दर्शक दिपक पाटील यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या ‘आशा’चे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दिपक पाटील हे निर्माते असून मुरलीधर चटवानी आणि रवींद्र औटी सहनिर्माते आहेत. पॅनोरमा स्टुडिओजच्या माध्यमातून प्रदर्शित होणारा हा चित्रपट नाविन्यपूर्ण कथानक आणि वास्तववादी मांडणीसह येत्या १९ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande