
मुंबई, 14 डिसेंबर (हिं.स.)। टेक दिग्गज ऍपलने आयफोनसाठी आयओएस 26.2 हा नवा अपडेट अधिकृतपणे जारी केला आहे. सप्टेंबर 2025 मध्ये रोलआउट झालेल्या आयओएस 26 नंतरचा हा दुसरा मोठा अपडेट असून, गेल्या काही आठवड्यांपासून तो डेव्हलपर आणि पब्लिक बीटा स्वरूपात चाचणीसाठी उपलब्ध होता. आता हा अपडेट सर्व पात्र आयफोन वापरकर्त्यांसाठी स्टेबल व्हर्जनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.
आयओएस 26.2 अपडेटमुळे आयफोनमध्ये अनेक नवे आणि उपयुक्त फीचर्स जोडण्यात आले आहेत. लिक्विड ग्लास यूजर इंटरफेससाठी अधिक कस्टमायझेशनचे पर्याय देण्यात आले असून, लॉक स्क्रीनवरील घड्याळाची ओपेसिटी बदलण्याची सुविधाही उपलब्ध झाली आहे. ऍपल म्युझिक मध्ये आता ऑफलाइन लिरिक्स डाउनलोड करण्याची सुविधा देण्यात आली असून, इंटरनेट नसतानाही गाण्यांचे शब्द पाहता येणार आहेत. याशिवाय, होम टॅबमधील टॉप पिक्स सेक्शनमध्ये युजर्सना त्यांच्या फेव्हरेट गाण्यांची प्लेलिस्ट थेट दिसणार आहे.
या अपडेटमध्ये सुरक्षिततेवरही विशेष भर देण्यात आला आहे. ऍपलच्या एन्हान्स्ड सेफ्टी अलर्ट फीचरद्वारे पूर, नैसर्गिक आपत्ती आणि इतर आपत्कालीन परिस्थितींबाबत पूर्वसूचना दिली जाणार आहे. प्रभावित भागांचा नकाशा आणि अतिरिक्त सुरक्षाविषयक मार्गदर्शनाची लिंकही या अलर्टमध्ये दिसणार असून, सध्या हे फीचर केवळ अमेरिकेत उपलब्ध असणार आहे.
रिमाइंडर्स अॅपमध्ये आता अलार्मची सुविधा जोडण्यात आली आहे. यामध्ये स्नूझ आणि लाईव्ह अॅक्टिव्हिटी सपोर्ट मिळत असल्याने महत्त्वाची कामे वेळेवर लक्षात ठेवणे अधिक सोपे होणार आहे. एअरड्रॉप वापरताना अनोळखी व्यक्तींना फाइल पाठवण्यासाठी अतिरिक्त व्हेरिफिकेशन लेयर देण्यात आली असून, सेंडरच्या डिव्हाइसवर कोड टाकावा लागणार आहे.
पॉडकास्ट अॅपमध्ये ऑटोमॅटिकली जनरेट होणारे चॅप्टर्स जोडण्यात आले असून, एपिसोडमध्ये सहज नेव्हिगेशन करता येणार आहे. तसेच, संबंधित पॉडकास्टचे लिंक थेट प्लेअर आणि ट्रान्सक्रिप्टमधून पाहता आणि फॉलो करता येणार आहेत. गेम्स अॅपमध्ये गेम्स कॅटेगरी, साईज आणि इतर निकषांनुसार सॉर्ट करण्यासाठी नवे फिल्टर्स देण्यात आले आहेत. रिअल-टाइम इन-गेम चॅलेंज स्कोअर बॅनर आणि Backbone, Razer सारख्या कंट्रोलर्ससाठी सुधारित सपोर्टही या अपडेटचा भाग आहे.
याशिवाय, एक्सेसिबिलिटी सेटिंग्समध्ये अलर्टसाठी स्क्रीन फ्लॅशिंगचा पर्याय, टुडे फीडमध्ये Apple News साठी नवा लिंक आणि होम अॅपमध्ये मल्टीपॅक अॅक्सेसरी पेअरिंगदरम्यान एकाच सेटअप कोडचा वापर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. iOS 26.2 अपडेट डाउनलोड करण्यासाठी वापरकर्त्यांनी Settings मधील General पर्यायात जाऊन Software Update वर टॅप करावे, असे Apple ने स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule