
परभणी, 18 डिसेंबर (हिं.स.)।
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची मुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी येथील समाजवादी पार्टीने जिल्हाधिकार्यांमार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
महानगर जिल्हाध्यक्ष स. इरशाद अली, जिल्हा महासचिव मोईन खान, जिल्हा उपाध्यक्ष शेख नदीम, कोषाध्यक्ष जावेद खान, सचिव सिद्दीकी रखमोद्दीन, सय्यद शाहेद, शेख माजेद, शेख सलमान आदींच्या शिष्टमंडळाने आज आपल्या मागण्या संदर्भातील एक निवेदन जिल्हा प्रशासनामार्फत राष्ट्रपतींना पाठवले. त्याद्वारे, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पटना येथील एका कार्यक्रमात आयुष डॉक्टर नुसरत परवीन यांना नियुक्तीपत्र देताना त्यांच्या हिजाबचा बुरखा ओढल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त केला. या कृत्यामुळे संबंधित महिला तसेच संपूर्ण मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप केला. मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीकडून असे वर्तन अपेक्षित नाही. हे कृत्य अशोभनीय असून, यामुळे राज्यातील महिला सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. जर तात्काळ कारवाई करण्यात आली नाही, तर समाजवादी पार्टीच्या वतीने महाराष्ट्र राज्यात धरणे व निदर्शने करण्यात येतील, असा इशाराही या निवेदनाद्वारे दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis