
चंद्रपूर, 19 डिसेंबर (हिं.स.)।राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक–२०२५ च्या कार्यक्रमानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, गडचांदुर, भद्रावती, वरोरा, चिमूर, ब्रम्हपूरी, नागभिड, मुल, घुग्गुस या नगरपालिकांसह भिसी नगरपंचायतीसाठी दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजतापासून मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.
मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये निर्बंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत लागू राहतील.आदेशानुसार, मतमोजणी केंद्राच्या बाहेरील १०० मीटर परिसरात सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंध राहील. तसेच दुकाने, आस्थापना व व्यवसाय केंद्र बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, पोलीस, विद्युत, अग्निशमन व सुरक्षा व्यवस्थेतील वाहनांनाच केंद्र परिसरात प्रवेश देण्यात येणार असून इतर सर्व वाहनांवर बंदी राहील.
राज्य निवडणूक आयोगाने वितरित केलेल्या अधिकृत ओळखपत्राशिवाय कोणालाही मतमोजणी परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच मतमोजणीच्या दिवशी केंद्राच्या बाहेरील १०० मीटर परिसरात दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. उमेदवार व पत्रकारांना ठरवून दिलेल्या बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार मोबाईल फोन वापरण्याची मुभा देण्यात आली असली तरी प्रत्यक्ष मतमोजणी कक्षात मोबाईल फोन किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण नेण्यास व वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
याशिवाय, मतमोजणी केंद्राच्या सभोवताल १ किलोमीटर परिसरात दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ड्रोन किंवा ड्रोनसदृश उडणाऱ्या वस्तू उडविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव