
रायगड, 18 डिसेंबर (हिं.स.)।अलिबाग तालुक्यात आठ जणांवर हल्ले करून दहशत निर्माण करणारा बिबट्या वनविभागाच्या यंत्रणांना चकवा देत पुन्हा एकदा पसार झाला आहे. नागाव आणि आक्षी या दोन ठिकाणी सलग हल्ले करूनही बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अपयश आले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
८ डिसेंबर रोजी अलिबाग तालुक्यातील नागाव येथील वर्तक आळी परिसरात अत्यंत वर्दळीच्या भागात बिबट्याने धुमाकूळ घातला. तब्बल सहा जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. या घटनेत वनविभागाचे कर्मचारीही जखमी झाले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तीन शाळा बंद ठेवण्यात आल्या. पुणे व रोहा येथून विशेष बचाव पथक पाचारण करून सुमारे ८० अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम राबवली. अरुंद जागेत बिबट्याला घेरून डार्ट मारण्यात आला, मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तो पसार झाला.
दोन दिवसांनंतर हाच बिबट्या आक्षी येथील साखर कोळीवाड्यात पहाटे शिरला. एका हॉटेलमधील कामगारावर व प्रातःविधीसाठी गेलेल्या नागरिकावर हल्ला करून दोन जणांना जखमी केले. फणसाड अभयारण्यापासून २५ ते ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या सागरी पट्ट्यात बिबट्याचा वावर दिसल्याने नागरिक चक्रावून गेले.
यानंतर कांदळवन क्षेत्रात पिंजरे, ट्रॅप कॅमेरे व ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. समाजमाध्यमांवर अफवा पसरल्या, परंतु त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
या घटनेमुळे वन्यजीव व्यवस्थापनातील त्रुटी समोर आल्या असून आवश्यक साधनसामग्री, मोबाईल व्हॅन व आधुनिक यंत्रणांचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिबट्या कुठे गेला, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके