
नवी दिल्ली, 18 डिसेंबर (हिं.स.) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) यांच्या जागी आणण्यात आलेले ‘जी राम जी’ विधेयक लोकसभेत आज विरोधकांच्या तीव्र गोंधळात मंजूर झाले. विधेयक स्थायी समितीकडे पाठवावे, या मागणीसाठी विरोधी पक्षांनी सभागृहाच्या वेलमध्ये उतरून जोरदार आंदोलन केले, तर काही खासदारांनी विधेयकाच्या प्रती फाडल्याने वातावरण तापले.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी विधेयकाचे समर्थन करताना सांगितले की, नव्या कायद्यामुळे मनरेगामधील भ्रष्टाचाराला आळा बसेल. सरकारने सर्व संबंधित घटकांशी चर्चा करूनच हे विधेयक आणले असून, एनडीए सरकार कामावर लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधक मात्र या विधेयकाला गरीबविरोधी ठरवत आहेत. विरोधकांचा आक्षेप असा आहे की, या कायद्यातून महात्मा गांधींचे नाव काढून टाकणे म्हणजे राष्ट्रपित्याचा अपमान आहे. तसेच या विधेयकामुळे राज्यांवर आर्थिक भार वाढेल, असा आरोप काँग्रेस नेत्या प्रियंका वाड्रा, डीएमकेचे टी. आर. बालू आणि समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव यांनी केला.गोंधळादरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना शांततेचे आवाहन करत सांगितले की, या विधेयकावर सविस्तर चर्चा झाली असून आता ते राज्यसभेत मांडले जाईल. “लोकांनी तुम्हाला येथे कागद फाडण्यासाठी पाठवलेले नाही. संपूर्ण देश तुम्हाला पाहत आहे,” असे कठोर शब्दांत त्यांनी सुनावले.
सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर प्रियंका गांधी वाड्रा यांनी सांगितले की, या विधेयकामुळे ग्रामीण रोजगार हमी योजना संपवली जाईल. मनरेगा ही सर्वात गरीब लोकांसाठी आधार आहे. राज्यांकडे पुरेसा निधी नसताना हा भार टाकला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, केंद्रीय मंत्री एस. पी. सिंह बघेल आणि चिराग पासवान यांनी सभागृहात कागद फाडण्याच्या प्रकाराचा तीव्र निषेध केला. लोकशाहीत अशा कृतींना स्थान नसल्याचे सांगत, विरोध करण्याचा अधिकार आहे; मात्र संसदीय शिस्त पाळली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी