
नाशिक, 18 डिसेंबर (हिं.स.)।
: जिल्ह्यात ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. त्यासाठी कालबद्ध नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.
जिल्हाधिकारी . प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेत आज दुपारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे, जिल्हा परिषदेचे अतिरक्ति मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्या घरांचे लक्ष्य मंजूर झालेले नाही, अशा सर्व घरांची माहिती घेऊन त्यांचे वर्गीकरण करावे. जमीन अनुदानासाठी परिपूर्ण प्रस्ताव आठवडाभरात सादर करावा. जमिनीसाठी आदेश पारित झाल्यानंतरही सातबारा किंवा ८ (अ) आणि ताबा मिळाला नाही, तर मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, तहसीलदार यांच्या समवेत बैठक आयोजित करावी. त्यानंतर आवश्यकता भासल्यास पोलिस बंदोबस्तात कार्यवाही करावी. त्यानंतर विस्तार अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांच्यासमवेत ताबा घेऊन आराखडा तयार करावा.
‘सर्वांसाठी घरे’ या मोहिमेंतर्गत बांधण्यात येणाऱ्य घरांच्या बांधकामासाठी गावातील वाळूचे घाट निश्चित करावेत. बांधकाम करण्यात येणाऱ्या घरांपेक्षा अतिरिक्त वाळू उपलब्ध असेल, तर ती शेजारील गावातील घरांच्या बांधकामासाठी उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी वाळू उत्खनन व वाहतुकीचे नियोजन करावे, असेही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगत त्यांनी सविस्तर सूचना केल्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पवार यांनी ‘सर्वांसाठी घरे’ या मोहिमेंतर्गत आतापर्यंत झालेल्या कामाची माहिती दिली. तसेच घरांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्यात येईल, असे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV