
नवी दिल्ली , 18 डिसेंबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ओमान दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत भारत आणि ओमान यांच्यात व्यापक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, या करारामुळे २१व्या शतकात भारत–ओमान भागीदारीत नव्या विश्वासाचा आणि नव्या उत्साहाचा संचार होईल.
भारत–ओमान बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात भाषण करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “हा मंच भारत–ओमान भागीदारीला नवी दिशा आणि नवी गती देईल, तसेच दोन्ही देशांमधील संबंध नव्या उंचीवर पोहोचतील.” त्यांनी सांगितले की, सभ्यतेच्या प्रारंभापासूनच आमचे पूर्वज समुद्रमार्गे एकमेकांशी व्यापार करत आले आहेत. मांडवी आणि मस्कट यांच्यातील अरबी समुद्र एक मजबूत दुवा ठरला. या दुव्याने आमचे संबंध दृढ झाले आणि संस्कृती व अर्थव्यवस्थेला बळ मिळाले. आज आपण नक्कीच म्हणू शकतो की समुद्राच्या लाटा बदलतात, ऋतू बदलतात; मात्र भारत आणि ओमान यांची मैत्री प्रत्येक ऋतूत मजबूतच राहिली आहे.
पंतप्रधानांनी सांगितले की, आमचे नाते विश्वासाच्या पायावर उभे आहे आणि काळानुसार ते अधिकच दृढ होत गेले आहे. भारत आणि ओमान यांचे कूटनीतिक संबंधांना ७० वर्षे पूर्ण झाली आहेत. “आज आपण असा ऐतिहासिक निर्णय घेत आहोत, ज्याचा प्रतिध्वनी पुढील अनेक दशकांपर्यंत ऐकू येईल. व्यापक आर्थिक भागीदारी करार २१व्या शतकात आपल्या भागीदारीला नवा विश्वास आणि नवी ऊर्जा देईल. यामुळे व्यापाराला नवी गती मिळेल आणि गुंतवणुकीबाबत विश्वास निर्माण होईल,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, गेल्या ११ वर्षांत भारताने केवळ धोरणांमध्येच बदल केलेले नाहीत, तर आपल्या अर्थव्यवस्थेचे ‘आर्थिक डीएनए’च बदलले आहे. वस्तू व सेवा कर (GST) मुळे भारत एक एकात्मिक बाजारपेठ बनला आहे, तर दिवाळखोरी व दिवाणी संहितामुळे पारदर्शकता वाढली असून गुंतवणूकदारांचा विश्वासही मजबूत झाला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी ओमानची राजधानी मस्कट येथे भारतीय समुदायालाही संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, “आज आपण सर्वजण एका कुटुंबाप्रमाणे एकत्र आलो आहोत. भारतातील विविधता हीच आपल्या संस्कृतीची भक्कम पायाभूत रचना आहे. आमच्यासाठी प्रत्येक दिवस नवे रंग घेऊन येतो, प्रत्येक ऋतू एक नवा उत्सव बनतो आणि प्रत्येक परंपरा नवी विचारसरणी घेऊन येते. म्हणूनच आम्ही भारतीय जिथे जाऊ, जिथे राहू, तिथल्या विविधतेचा आदर करतो. त्या देशाची संस्कृती, नियम आणि परंपरांमध्ये सहज मिसळून जातो. ओमानमध्ये आज मला हेच प्रत्यक्षात घडताना दिसत आहे.”
पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले, “भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला अलीकडेच आणखी एक मोठा सन्मान मिळाला आहे. युनेस्कोने दिवाळीचा मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत समावेश केला आहे. आता दिवाळीचा दिवा केवळ आपल्या घरांनाच नव्हे, तर संपूर्ण जगाला उजळवेल. जगभरात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. दिवाळीला मिळालेली ही जागतिक ओळख आशा, सद्भाव आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या त्या प्रकाशाची मान्यता आहे, जो संपूर्ण विश्वात उजेड पसरवतो.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode